• June 29, 2026

NPL-Tech

Noob Plays and Learns Technology

लिनक्स आणि विंडोज मध्ये काय फरक आहे?

प्रामुख्याने पहिले तर विंडोज आणि लिनक्स दोन्ही संगणक प्रणाली आहेत. त्यानुळे आपल्याला एखादा संगणक / लॅपटॉप वापरायचा असेल तर त्यासाठी एखाद्या संगणक प्रणालीची गरज पडतेच, कारण संगणक प्रणाली ही त्याचा प्राणवायू आहे. त्याशिवाय आपला संगणक काही कामाचा नसतो. एखादे कार्य करणे तर सोडा, ते आपल्याला सुरूच करता येत नाही. मग त्यात कितीही जबरदस्त हार्डवेयर असू देत. 

अर्थात ह्याचा अर्थ आपण कुठलेही संगणक कुठल्याही प्रणाली सोबत चालवू शकता, असे आपण म्हणू शकतो का? तर त्याचे उत्तर होय आणि नाही असे आहे. 

संगणकामधे अनेक इलेक्ट्रॉनिक घटक असतात. जसे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे प्रोसेसर, रॅम , डिस्प्ले इत्यादी. त्यामुळे आपली प्रणाली त्याला पूरक असली पाहिजे. उदाहरणार्थ MacOS हे फक्त ॲपलने विकसित केलेल्या हार्डवेयर मध्येच चालते (आपण विंडोज किंवा लिनक्स मात्र त्यामध्ये वापरू शकतो, पण ॲपलने नव्याने विकसित केलेल्या M-series प्रोसेसर मध्ये ती सोय सुद्धा आता बरीच कठीण झाली आहे) . तसेच आपण अँड्रॉईड ही प्रणाली ॲपलच्या स्मार्टफोन मध्ये वापरू शकत नाही. त्यामुळे प्रामुख्याने संगणक प्रणाली मध्ये आपले हार्डवेयर पूरक आहे की नाही ते तपासावे लागते आणि ती कार्यप्रणाली त्या प्रकारच्या संगणका (स्मार्टफोन किंवा इतर उपकरणासाठी ) साठी विकसित केली जाते. 

अर्थात दोन्ही प्रणाली मध्ये काही घटक वेगळे आहेत जे जाणून घेणे आपल्या उपयोगाचे ठरेल, आणि जेणे करुन आपल्याला आपल्या कार्यशैलीला पोषक अशी कार्यप्रणाली निवडण्यास मदत होईल.

लिनक्स काय आहे?

मागील भागात (लिनक्स – एक ओळख) आपण लिनक्स संदर्भात थोडी विस्तॄत माहिती घेतली आहे. थोड्या संक्षेपात सांगायचे म्हणजे, ही एक मोफत आणि मुक्त कार्यप्रणाली आहे (Free and Open Source). मी खासकरून संगणक प्रणाली असे म्हणालो नाही कारण लिनक्सचा निर्माण जरी संगणक प्रणाली म्हणून झाला असला , तरी हळूहळू विकसित होऊन ती प्रणाली  आपल्याला स्मार्टफोन पासून  गाड्यांपर्यंत, आणि सुपरकॉम्पुटर पासून टीव्ही पर्यंत अनेक उपकरणात आढळून  येते. 

लिनक्स जरी लाइनस टॉरवाल्डस ने विकसित केली असली तरी GPL लाइसेंस वर आधारित असल्यामुळे तिच्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. त्यामुळे उद्या जर तुम्ही ठरवले तर लिनक्स वर आधारित एखादी कार्यप्रणाली तुम्ही सुद्धा विकसित करू शकता आणि वापरू शकता. आपल्याला हवा तसा बदल त्यात करणे हे सुद्धा तुम्हाला शक्य आहे, कारण त्याचा सोर्स कोड हा मुक्त आणि मोफत आहे. 

1990 साली लाइनस टॉरवाल्डस ने लिनक्सच्या कर्नेल (kernel) निर्मितीची सुरुवात केली आणि 17 सप्टेंबर 1991 साली त्याचे पहिले व्हर्जन जनतेसाठी GPL लाइसेंस अंतर्गत खुले करण्यात आले. त्या दिवसापासून आजतागायत लिनक्स ची निर्मिती नियमितपणे होत आहे, आणि लिनक्स हे डेव्हलपर साठी न राहता, आज सर्वसामान्यांसाठी वापरण्यायुक्त झाले आहे.

विंडोज काय आहे?

मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आज जगातील एक नावाजलेली आणि शेयर मार्केट मध्ये सर्वात श्रीमंत कंपन्यांमधली एक अशी कंपनी आहे. अर्थात तिचे सॉफ्टवेअर हे जगातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जातात. मात्र तिचा वैयक्तिक संगणकना (Personal Computer ) लोकप्रिय करण्यात फार मोठा किंवा सगळ्यात मोठा वाटा आहे असेच म्हणता येईल. 

मायक्रोसॉफ्ट निर्मित MS-DOS ह्या संगणक प्रणालीने जागतिक संगणक क्षेत्रात मोठीच क्रांती घडवली. August 1981 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या MS-DOS ची निर्मिती शेवटी 1998 साली थांबली ह्यावरून त्याची उपयुक्तता लक्षात येते. अर्थात सन 1985 पासून जगात GUI चे वारे वाहू लागले होते. संगणक वापरकर्त्यांना त्याचे, वापरकर्त्याला अनुकूल असे इंटरफेस (GUI) भावत होते आणि सर्वसामान्यांना त्यामुळे संगणक वापरणे सोपे होत होते. त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने नोव्हेंबर 1985 साली विंडोज 1.0 निर्माण केले. अर्थात ही  फक्त MS-DOS ची  विस्तारित आवृत्ती होती ज्यात GUI चा वापर काही गोष्टींसाठी करण्यात आला होता.

Windows 95 जरी MS-DOS वर आधारित होते तरी ती एक स्वयंपूर्ण अशी संगणक प्रणाली म्हटली जाऊ शकते. अर्थात Windows 98 पासून मायक्रोसॉफ्टने विंडोज मधील MS-DOS चा वापर पूर्णतः बंद केला. 

मायक्रोसॉफ्ट ही एक व्यावसायिक कंपनी असल्या कारणाने, तिच्या निर्मित सॉफ्टवेयरचा वापर, कमर्शियल लाइसेंस वर आधारित असतो. आणि तिचा मालकी हक्क मायक्रोसॉफ्ट कडेच कायम राहतो. आपल्याला फक्त तिचा वापर करता येतो आणि तो सुद्धा  आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी योग्य असलेल्या लाइसेंस द्वारे. आणि त्याची फी ही मायक्रोस्फोट ठरवते.  

त्यामुळे कोणालाही विंडोजचे सोर्स कोड ठाऊक नसते आणि त्यात तुम्हाला काही सुद्धा बदल करता येत नाही. मायक्रोसॉफ्ट त्याची जी दिशा ठरवेल, त्याच प्रमाणे ते विकसित केले जाईल. अर्थात त्यात काही कस्टमाइजेशन सुविधा मायक्रोस्फोटने दिल्या आहेत, किंवा काही थर्ड पार्टी सॉफ्टवेयर वापरून आपल्याला त्यात काही बदल करता येतो पण तो तेवढाच, जेवढी मायक्रोसॉफ्ट परवानगी देते.

मायक्रोसॉफ्टच्या भारतीय वेबसाईट मध्ये ही किंमत Windows 11 साठी ₹10,000 ते 16,000 एवढी आहे. (Amazon  वर हीच किंमत साधारण ₹5000 – ₹7000 येते. )

आता पर्यंत आपल्या लक्षात आलेच असेल की विंडोज आणि लिनक्स मध्ये तत्वतः काही फरक आहेत. आणि त्याचप्रमाणे जिथे लिनक्स मुक्त प्रणाली आहे तिथेच विंडोज ही संगणक प्रणाली व्यवसाईक आहे. मात्र त्या व्यतिरिक्त आपण काही इतर फरक सुद्धा लक्षात घेऊया.

मार्केटशेअर

जागतिक संगणक क्षेत्रात विंडोजचा वापर अव्वल आहे. कमीतकमी 70% संगणक (PC / लॅपटॉप ) हे विंडोज संगणक प्रणाली वापरतात. ह्याउलट लिनक्सचा वापर जरी वैयक्तिक संगणक क्षेत्रात 4% पेक्षा कमी असला तरी सर्व्हर क्षेत्रात ते अग्रगण्य आहे. आणि जगातील 90% हून अधिक क्लाऊड आणि इंटरनेट सर्व्हर हे लिनक्स वापरतात. 

वैयक्तिक संगणका मध्ये झालेला ह्या प्रसारामुळे विंडोज वर आधारित असंख्य व्यावसाईक सॉफ्टवेयर वरून आपल्याला आढळून येतात. जसे की अडोबी कंपनीचे (Adobe) फोटोशॉप , प्रीमियर प्रो , लाइटरुम, मायक्रोसॉफ्टचे स्वतःचे ऑफिस सॉफ्टवेयर (वर्ड , एक्सेल , पॉवरपॉईंट इत्यादी ). अर्थात विंडोजच्या ह्या प्रसारामुळेच बरेचसे डेव्हलपर हे विंडोज वर आधारित सॉफ्टवेयर बनवतात कारण ती बाजारपेठ मोठी आहे. 

लिनक्सचे तत्व हे मुलतः मुक्त आणि ओपन सोर्स असल्यामुळे इथेही आपल्याला विंडोजच्या तोडीसतोड सॉफ्टवेयर सापडतात पण ते मोफत असल्या कारणाने व्यवसाईक कंपन्या त्यांच्या वाटेस फारसे जात नाहीत. 

विंडोज मध्ये फाईल, डायरेक्टरी आणि डिवाइस हे वेगळे मानले जातात, तर लिनक्स मध्ये ह्या सगळ्यांना फाईल म्हणूनच वागणूक दिली जाते.

विविधता

वर सांगितल्याप्रमाणे विंडोज हे मायक्रोसॉफ्ट कंपनी च्या मालकीचे आहे त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आपल्याला विंडोजचे जे व्हर्जन बाजारात उपलब्ध आहेत त्यावरच समाधान मानावे लागते. ह्याशिवाय विंडोज आपल्याला जेवढे कस्टमाइजेशन करण्याची सोय उपलब्ध करुन देते तेवढेच आपण करू शकता. किंवा काही थर्ड पार्टी सॉफ्टवेयर विकत घेऊन त्याद्वारे, थोडे आपल्या सोयीचे कस्टमाइजेशन करू शकता. 

लिनक्स हे ओपन सोर्स असल्यामुळे त्याच्यावर आधारित 600 हून अधिक डिस्ट्रो आपल्याला सापडतील. त्यामुळे आपल्या सोयीचे डिस्ट्रो सापडण्यास आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. ह्याशिवाय आपण आपल्याला हवे ते बदल इथे करुन किंवा जर आपण थोडे अधिक शिकलात तर आपल्या सोयीचे एक परिपूर्ण अशी संगणक प्रणाली सुद्धा निर्माण करू शकता. 

खालील चित्र (हे फक्त निवडक डिस्ट्रो आहेत) आपल्याला दर्शवेल की लिनक्स मध्ये किती विविध तऱ्हेचे डिस्ट्रो उपलब्ध आहे.

स्थैर्यता आणि विश्वसनीयता 

विंडोज एके काळी होते त्यापेक्षा आता बरेच स्थिर आणि विश्वसनीय झाले आहे. मात्र अधिक अधिक फिचर आणि यूजर फ्रेंडली करण्याच्या नादात विंडोजने बऱ्याचशा गोष्टी काढून टाकल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच अंशी विडोज अजूनही अस्थिर ठरते काही वेळा. आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला विंडोज च्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’ मुळे अधेमध्ये येतच असतो, ज्यात बऱ्याच वेळा एखादी गोष्ट करत असताना आपला संगणक अचानक एक ब्लू स्क्रीन दाखवून हँग होतो आणि आपल्याला त्याला  परत स्टार्ट करावे लागते

लिनक्स आज बहुतांशी सर्व सर्व्हर मध्ये वापरली जाते कारण मूलतः ती फार स्थिर आहे. लिनक्स सुरुवातीपासूनच स्थैर्यता, विश्वासर्यता आणि सुरक्षितता ह्या तत्त्वावर ठाम आहे. त्यामुळे आणि तिच्या मूलभूत आर्किटेक्चर  मुळे जगातील एक अग्रगण्य स्थिर अशी कार्यप्रणाली मानली जाते. त्यामुळेच महिनोन्महीने तिला रीस्टार्ट करण्याची आवश्यकता भासतच नाही.

सुरक्षितता

सुरक्षिततेच्या दृष्टीने लिनक्स ही विंडोजच्या तुलनेत सर्वोत्तम सुरक्षित मानली जाते. लिनक्समध्ये व्हायरस किंवा मालवेअर सापडत नाहीत असे नाही पण ते विंडोजच्या मनाने कमी आढळतात. आणि जरी एखादा नवीन हल्ला झाला तरीही, या प्रणालीचच्या मुक्त तंत्रज्ञानामुळे  कोणालाही ते दोष शोधता येतात आणि त्यांना दुरुस्त करता येतात. त्यामुळे असुरक्षा ओळखणे आणि त्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते.

विंडोजचा विस्तार एवढा मोठा आहे की हॅकर्स सर्वप्रथम त्यांना लक्ष करतात. आणि त्यामुळेच ते तेवढे सुरक्षित मानले जात नाही. शिवाय त्याचे निवारण करने हे मायक्रोसॉफ्टलाच जमू शकते आणि आपल्याला त्यांच्यावर अवलंबून रहावे लागते.

example.txt आणि Example.txt हे फाईल नेम लिनक्स मध्ये वेगळे तर विंडोज मध्ये एकच मानले जातात.

वापरण्याची सहजता (Ease of Use)

विंडोज पहिल्यापासूनच वापरकर्त्या साठी एक सुलभ आणि सोपी संगणक प्रणाली म्हणून डेव्हलप केली गेली आहे. त्यामुळेच तिचा GUI वापरून, आपल्याला हवे ते कार्य साध्य करता येते. म्हणूनच आपल्याला विंडोज मध्ये कमांड लाइन वापरण्याची आवश्यकता फारशी पडत नाही. 

लिनक्स आज जरी अतिशय यूज़र फ्रेंडली झाले असले तरी कुठे तरी ते विंडोज पेक्षा अजून ह्या बाबतीत थोडे दूर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला कमांड लाइन किंवा ज्याला लिनक्स मध्ये टर्मिनल म्हटले जाते त्याचा उपयोग करावा लागतो. आपल्याला कधी सपोर्ट लागला तर असंख्य फोरम आपल्याला त्याचा उपाय,  कमांड लाइन द्वारेच करायला मदत करतात.

नवनवीन ॲप्लिकेशन / हार्डवेयर 

जसे हॅकर्स विंडोजचा एकंदरीत स्थापित हिस्सा बघता त्यांना टारगेट करतात, तसेच असंख्य डेव्हलपर सुद्धा खास विंडोज साठी नवनवीन सॉफ्टवेयर नियमित निर्माण करतात. त्यामुळे विंडोज वर तुम्हाला हवे ते कार्य करण्यासाठी असंख्य सॉफ्टवेयर सापडतील. निव्वळ सॉफ्टवेयर नाही तर असंख्य हार्डवेयर (जसे प्रिंटर , मॉनिटर , कीबोर्ड , माऊस , ऑडियो वीडियो यंत्रणा इत्यादी … ) आणि त्यासाठी लागणारे ड्रायव्हर हे सर्वप्रथम विंडोज वर किंवा विंडोज साठीच निर्माण केले जातात. 

नव्वदीच्या दशकात जे लिनक्स होते, त्यात आणि आज, आमूलाग्र बदल झाला आहे. आज लिनक्स हे अधिक प्रगल्भ आहे. इथे सुद्धा आपल्या कार्यासाठी लागणारे असंख्य ॲप्लिकेशन सापडतील. अर्थात विंडोजच्या मानाने ही संख्या कमीच ठरेल. मात्र तरीही आपले कुठे अडणार नाही. अर्थात विंडोजचे जे सॉफ्टवेयर स्टोर आहे, त्यामानाने आपल्याला लिनक्सचे ॲप्लिकेशन स्टोर हे जास्त भावेल ही जमेची बाजू आहे. 

अर्थात बरेचसे हार्डवेयर जरी लिनक्स सपोर्ट करत असले तरी त्यातील सगळेच फिचर, विंडोज एवढ्या सोप्या पद्धतीने चालतीलच ह्याची ग्वाही देता येत नाही. जसे Nvidia चे ग्राफिक कार्ड किंवा लॉजीटेकचे माऊस. हे लिनक्स वर चालतात, पण ह्या कंपनी बऱ्याच वेळा ह्यांचा पूर्ण आणि योग्य वापर करण्याकरता जे सॉफ्टवेयर पुरवतात ते लिनक्स साठी डेव्हलप करत नाहीत. त्यामुळे कोणा त्रयस्थाने निर्माण केलेल्या सॉफ्टवेयर वर आपल्याला अवलंबून रहावे लागते. 

सिस्टम अपडेट 

आपण विंडोज वर काम करताना, कधी कधी हे आढळते की अचानक विंडोज आपल्याला सिस्टम अपडेट होणार आहे असा मेसेज देते. सिस्टम अपडेट करते आणि आपोआपच आपला संगणक रिस्टार्ट होतो. विंडोज अपडेट ह्यासाठी कुविख्यात आहे. बऱ्याच वेळा आपल्याला नको असलेल्या वेळेस ते अपडेट मोड मध्ये जाते आणि आपण करत असलेले काम जर सेव्ह केलेले नसेल तर ते वाया सुद्धा जाऊ शकते त्यामुळे. 

नवख्या वापरकर्त्याला हे अपडेट सेटिंग कुठे आणि कसे बदलायचे ते ठाऊक नसते. आणि केलेले असले तरी  विंडोज अपडेट केल्यावर आपोआपच हे सेटिंग पुन्हा ऑटोमैटिक अपडेट वर आणते. 

अर्थात लिनक्स मध्ये तसे नसते. आपण कधी अपडेट करायचे हे सर्वस्वी वापरकर्त्याच्या हातात असते. विंडोजच्या मानाने हे अपडेट वेगात होते आणि बहुतेक वेळ आपल्याला रिबूट करायची आवश्यकता तर भासत नाहीच शिवाय आपण करत असलेले काम सुद्धा थांबवायची गरज पडत नाही.

गतिशीलता

जसे जसे विंडोज प्रगत होत गेले तसे तसे त्याला हार्ड डिस्क मध्ये जास्त जागा लागू लागली. त्याशिवाय त्याला रॅम सुद्धा जास्त लागू लागली. आणि त्यामुळेच नवनवीन विंडोज व्हर्जन साठी लागणारे हार्डवेयर सुद्धा तेवढेच शक्तिशाली लागू लागले. म्हणजे थोडक्यात विंडोज वापरासाठी कालांतराने आपल्याला नवीन संगणक विकत घ्यावा लागणार, म्हणजे खर्च वाढला. 

विंडोज वापरासाठी बरेचसे प्रोसेस एकाच वेळेस सुरू केले जातात. शिवाय वापरकर्ता जसे जसे नवीन सॉफ्टवेयर वापरतो (मल्टी टास्किंग) त्याने अजून प्रोसेस वापरात येतात आणि मेमरी / डिस्क हॉगिंग नामक प्रकारामुळे विंडोज अजून स्लो होते. 

लिनक्स ही एक अत्यंत lean अशी पद्धती आहे ज्यामुळे त्याची रॅम आवश्यकता अतिशय माफक आहे. काही लिनक्स कार्यप्रणाली तुम्ही अगदी USB ड्राईव्ह मध्ये सुद्धा इन्स्टॉल करून वापरू शकता. काही लिनक्स डिस्ट्रो अगदी 2GB रॅम मध्ये चालण्या एवढ्या हलक्या (lightweight) असतात.

लिनक्सच्या अंतर्गत प्रणालीत जे फाईल सिस्टिम वापरले जातात (उदा : EXT4, BTRFS वगैरे) त्यांना विंडोज सारखे सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेले डिस्क डिफ्रॅगमेंटेशन वगैरेची गरजच भासत नाही. एकाच वेळी असंख्या प्रोसेस ते लीलया पेलू शकते.

विंडोज मध्ये बॅकस्लॅश “\” तर लिनक्स मध्ये स्लॅश “/” वापरला जातो!

वापरकर्त्याची गोपनीयता

स्थैर्यता, विश्वसनीयता आणि सुरक्षितता याच बरोबर गोपनीयता सुद्धा लिनक्सचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. शिवाय वापरकर्त्याची माहिती किंवा ते कुठले सॉफ्टवेयर वापरत आहेत, कुठल्या साइट मध्ये त्यांना जास्त रस आहे, हे व ह्यासारखेच, जे जाहिरातीसाठी उपयुक्त माहिती असते त्याचा लिनक्सला काही फायदा नसतो.  मुळात लिनक्सवर कोण्या एका कंपनीचा अधिकार नाही. त्यामुळे वापरकर्त्याची गोपनीयता राखली जाते. 

विंडोज वापरताना त्याच्या लाइसेंस मध्ये तुमच्या वापराच्या महितीचा विंडोज उपयोग करू शकतो किंवा ती माहिती मायक्रोसॉफ्ट गोळा करू शकतो असे एक कलम आहे. आणि त्यामुळे विंडोज मध्ये telemetry द्वारे तुमची माहिती मायक्रोसॉफ्ट पर्यंत पोहोचत असते. शिवाय गेल्या काही वर्षात विंडोज अधिक जाहिरातीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुम्ही वन ड्राईव्ह मध्ये काय करत आहात, कोर्टानाला काय प्रश्न विचारात आहात अशी सगळी माहिती मायक्रोस्फोट जाहिराती साठी वापरत आहे.

गेमिंग

गेमिंग सुद्धा इतर अनेक सॉफ्टवेयर प्रमाणे एक असे क्षेत्र आहे जिथे विंडोजने बाजी मारली आहे. बऱ्याच कंपन्या, जसे एपिक गेम्स, स्टीम वगैरे, आपले अनेक गेम्स विंडोज साठी डेव्हलप आणि रिलीज़ करतात. अनेक AAA आणि इतर इंडी गेम्स हे विंडोज साठी खास करुन लिहिले जातात. आणि म्हणूनच Nvidia सारख्या हार्डवेयर कंपन्या आपले GPU विंडोज साठी विकसित करतात. 

लिनक्स मध्ये पूर्वी फारसा गेमिंग साठी सपोर्ट नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्टीम आणि प्रोटोन सारखे प्लेटफॉर्म लिनक्स वर आल्यामुळे लिनक्स सुद्धा गेमिंग मध्ये आता फारसे मागे नाही. स्टीमने तर आपले पहिले हँडहेल्ड गेमिंग डिवाईस ‘स्टीम डेक’ निर्माण करताना, आर्च लिनक्स ची कार्यप्रणाली म्हणून निवड केली आहे. त्यामुळे लिनक्स गेमिंगला अजून चालना मिळाली आहे.

ह्याव्यतिरिक्त अजून काही फरक ह्या दोन प्रणाली मध्ये, ते संक्षेपात पाहूया.

निकषलिनक्सविंडोज
इन्स्टॉलेशनआता सोपे झाले आहे पण नवीन सॉफ्टवेयर लोड करण्यासाठी बऱ्याच वेळा कमांड लाईनची मदत लागतेच. नवीन OS लोड करने जलद.नवीन इन्स्टॉलेशन सोपे आहे. मात्र वेळ फार घेते आणि बऱ्याच वेळा रिबूट करावे लागते.
OS प्रोग्रामिंग लँग्वेजअसेंबली आणि Cअसेंबली आणि C
सपोर्टमोठी कम्युनिटी आणि फोरमफ्री आणि पेड सपोर्ट. फोरम सपोर्ट
कर्नेलमोनोलिथिक कर्नेलमाइक्रो कर्नेल
फाईल नेमकेस सेंसिटिव. File.txt आणि file.txt हे वेगळे मानले जातातकेस सेंसिटिव नाहीत. File.txt आणि file.txt हे वेगळे मानले जात नाहीत.
फाईल पाथइथे फॉरवर्ड स्लॅश (किंवा स्लॅश) म्हणजेच / वापरला जातो. उदरणार्थ home/documents/file.txtइथे बॅक स्लॅश म्हणजेच \ वापरला जातो. उदरणार्थ home\documents\file.txt
प्रणाली कुठे वापरू शकतासंगणकापासून, सर्व्हर , स्मार्टफोन, IOT उपकरणे, गाड्या इत्यादीप्रामुख्याने संगणकांसाठी