एक काळ असा होता कि लिनक्स फक्त टेक्निकल आणि डेव्हलपर समुदायासाठी आहे असे मानले जात होते. आणि ते होते सुद्धा तसेच. कालांतराने त्यात एवढे बदल झाले आहेत कि आज ते एखादा नवशिका सुद्धा वापरू शकतो. लिनक्स इन्स्टॉल करणे तर त्यांच्या इंस्टॉलर मुळे विंडोज इन्स्टॉल करण्यापेक्षा सोपे झाले आहे. मात्र अजून सुद्धा असे काही लिनक्स डिस्ट्रो आहेत कि जे इन्स्टॉल करण्यापासून ते वापरण्यापर्यंत एका वेगळ्या तांत्रिक कौशल्याची गरज पडते. नवीन वापरकर्त्यांनी ह्या पासून लांब राहावे. (उदा. आर्च [Arch], किंवा प्युअर डेबियन [डेबियन])

पण आपण इथे नवीन वापरकर्त्यांबद्दल बोलत आहोत जे लिनक्स डिस्ट्रो मध्ये असलेली विविधता बघून गोंधळून जाऊ शकतात, आणि चुकीच्या निवडीने ते लिनिक्सच्या वाट्याला पुन्हा फिरकणार नाहीत. ह्या लेखाचा उद्देश आपली लिनक्स वाटचाल नुसती सोपी नाही तर आनंदी आणि खात्रीशीर सुद्धा होईल.
नवीन वापरकर्त्यांसाठी लिनक्स निवडताना काय निकष वापरले?
- इन्स्टॉल करण्यास सोपे : आपला लिनक्स प्रवास सोपा करण्याचे कार्य, त्याच्या इंस्टॉलर पासून सुरु होते. जर मुळात तेच कठीण असेल तर एखादा नवीन वापरकर्ता पुढेच जाणार नाही.
- वापरण्यास सोपे आणि सोयीचे : बहुतांशी आपली संगणकाची ओळख हि विंडोज किंवा मॅक OS पासून सुरु होते हे मान्य करावेच लागणार. त्यात सुद्धा विंडोज जास्त. म्हणून नवीन लिनक्स वापरकर्त्याला जर एखादे लिनक्स डिस्ट्रो; विंडोज सारखे दिसले तर त्याचा हा नवीन प्रवास सुरळीत होईल.
- विनामूल्य : आपला संगणक नवीन असो व जुना, आपले चार पैसे वाचले तर कोणाला ते नको असते.
- सुरक्षितता : विंडोज जरी आपण वापरात असाल तरी त्याचा सपोर्ट हा बंद झालेला असू शकतो. जरी ते व्यवस्थित चालत असेल तरी त्याचे सेक्युरिटी अपडेट बंद झाले असेल आणि त्यामुळे आपला संगणक हॅक होण्याचे चान्स वाढलेले असतात. त्यामुळे आपल्या लेटेस्ट विंडोज वापरावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील (विंडोज ११ तर कदाचित इन्स्टॉल सुद्धा करता येणार नाही कारण आपले हार्डवेअर त्या साठी पोषक नसेल). लक्षात ठेवा ज्यांचे सेक्युरिटी अपडेट बंद झालेले असेल अशी संगणक प्रणाली वापरणे फार धोकादायक ठरू शकते कारण आपले बरेचसे बँकिंग आणि इतर व्यवहार आपण संगणकाद्वारे करतो हल्ली.
- निवडलेली लिनक्स प्रणाली हि स्वतःच नवीन नसली पाहिजे. कारण बरेचसे असे लिनक्स डिस्ट्रो येतात आणि जातात कारण त्यांचे डेव्हलपर त्यांना अपडेट करायला वेळ देऊ शकत नाहीत, आणि काळाच्या ओघात ते मावळून जातात. त्यामुळेच जे डिस्ट्रो बरीच वर्ष वापरात आहेत आणि नियमित त्यांची नवीन आवृत्ती येते आहे त्यांनाच इथे स्टॅन मिळाले आहे.
ह्याच निकषांवरून खालील लिनक्स डिस्ट्रिब्युशन आपल्या साठी योग्य ठरतील ह्याची आम्हाला खात्री आहे.
१. लिनक्स मिंट (LINUX MINT)

- वापरण्यास विंडोजशी अत्यंत मिळते जुळते
- जुन्या हार्डवेअर साठी बऱ्याच प्रमाणात योग्य
- उबंटू वर आधारित पण त्यात अजून सुधारणा केलेले
- काही प्रोप्रायटरी हार्डवेअर (जसे NVIDIA , ATI, ब्रॉडकॉम वायफाय ) ह्यावर सुरुवातीला चालणार नाहीत पण तुम्ही त्यांना लिनक्स मिंट च्या ड्राइवर मॅनेजर द्वारे इन्स्टॉल करू शकता)
लिनक्स मिंट आजच्या घडीला विंडोज वापरकर्त्यांसाठी एक सर्वात योग्य लिनक्स प्रणाली आहे. जरी सर्वात जास्त प्रसिद्ध लिनक्स प्रणाली उबंटू असली तरी लिनक्स मिंट, उबंटू पेक्षा जास्त सोपे वाटते. त्याचे कारण म्हणजे त्याचे सिनामेन (Cinnamon) डेस्कटॉप. विंडोज XP, 7, 8 किंवा अगदी 10 वापरलेल्यांना देखील हे ओळखीचे वाटेल.
लिनक्स मिंट मध्ये तुम्हाला वेगळे डेस्कटॉप सुद्धा भेटतील, जसे XFCE किंवा MATE (उच्चार माटे). लिनक्स मिंट जुन्या हार्डवेअर साठी अत्यंत उपयुक्त आहे आणि खास करून XFCE वर्जन तुम्हाला वेगवान सुद्धा वाटेल.
लिनक्स मिंट मध्ये तुम्हाला उबंटू सारखेच GUI युक्त असलेले सॉफ्टवेअर रिपॉजिटरी (ऍप्प स्टोअर ) आहे. ज्यात असंख्य रोजच्या वापराचे सॉफ्टवेअर तुम्हाला एका स्लिक मध्ये इन्स्टॉल करता येते.
२. झोरीन OS (Zorin OS)

- लिनक्स मिंट पेक्षा सुद्धा जास्त विंडोजशी जास्त मिळते जुळते
- तुम्हाला विनामूल्य आणि विकत घेता येण्यासारखे, असे दोन्ही व्हर्जन मिळतात
- कोर (Core) व्हर्जन मध्ये बरेच सॉफ्टवेअर मिळतात तर लाईट (LITE) व्हर्जन जुन्या संगणकासाठी उपयुक्त
- मॅक आणि विंडोज संगणक दोन्ही साठी उपयुक्त
झोरीन मध्ये ४ पैकी ३ आवृत्या विनामूल्य आहे आणि एक विकत घ्यावे लागते. अर्थात त्यांचे विनामूल्य व्हर्जन (Education , Core आणि Lite ) हे सवर्सामान्यांसाठी एक्दम उपयुक्त आहे आणि आपले कुठे सुद्धा अडणार नाही. त्यांचे Pro व्हर्जन हे $39 मध्ये उपलब्ध आहे आणि त्यात मॅक OS सारखे लेआऊट आणि इतर काही लेआऊट मिळतील. ह्यात तुम्हाला कंपनी कडून सपोर्ट मिळतो आणि काही खास वॉलपेपर सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात.
Core आवृत्ती मध्ये तुम्हाला हवे असणारे सॉफ्टवेअर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असते. आणि नसले तरी तुम्ही कुठल्याही लिनक्स प्रमाणे इथे इंस्टॉल करू शकता कारण हे सुद्धा उबंटू वर आधारित आहे. Lite आवृत्ती हि जुन्या संगणकांसाठी योग्य पसंती ठरेल.
३. उबंटू (UBUNTU Linux)

- लिनक्स मध्ये सर्वात लोकप्रिय असणारे एक डिस्ट्रो
- वापरण्यास अत्यंत सोपे (मात्र वर सांगितलेल्या डिस्ट्रो एवढे सोपे नाही)
- इंटरनेट वर सपोर्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध
- बऱ्याच वेगवेगळ्या आवृत्या उपलब्ध (मुबलक चॉईस)
- बरेच डिस्ट्रो आज उबंटू वर सर्वाधिक आधारलेल्या सापडतील (उदा. लियूक्स मिंट, झोरीन , एलिमेंटरी )
- प्रचंड मोठे सॉफ्टवेअर सेन्टर (बरेच सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन बरोबरच मिळतात)
- प्रचंड प्रमाणात हार्डवेअर सपोर्ट
- ह्याची Gnome (उच्चर गनोम किंवा जी-नोम) आवृत्ती साठी हार्डवेअर थोडे जास्त ताकदीचे आवश्यक.
लिनक्स बद्दल थोडी सुद्धा माहिती असलेल्यांना उबंटू नक्कीच ठाऊक असेल. लिनक्स जास्त प्रचलित आणि सोपे करण्या मागे सिंहाचा वाटा हा उबुंटूचे जनक कॅनोनिकल (Canonical ) कंपनीला द्यावे लागेल. आणि ते रास्त सुद्धा आहे कारण उबंटू फारच युजर फ्रेंडली आहे. आणि इंटरनेट वर त्यासंदर्भात माहिती आणि सपोर्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
उबंटू एका दशकापूर्वी अत्यंत सोपे, नवशिक्यांसाठी आणि युजर फ्रेंडलीपणा साठी नावाजले जात होते. आज जरी त्याची जागा लिनक्स मिंट ने घेतली असेल, तरी उबंटू आपले अढळ स्थान राखून आहे. आपल्याला एखादा जरी प्रश्न असेल, तरी इंटरनेट वर त्याबद्दल माहिती, उबंटू साठी त्वरित उपलब्ध होते, एवढे त्याचे वापरणारे आहेत.
उबंटूचे मूळ डेस्कटॉप हे ग्नोम आहे. हे लिनक्स मिंटच्या सिनामेन डेस्कटॉप एवढे यूजर फ्रेंडली नसले (विंडोज वापरणाऱ्यांसाठी) तरी ते शिकायला जास्त वेळ जाऊ नये. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली कि वाटेल बाकीचे डेस्कटॉप सुद्धा असेच का वागत नाहीत. कारण ते आपली कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. ज्यांना ते गमत नाही त्यांच्या साठी कुबुंटु (Kubuntu) किंवा लुबुंटु (Lubuntu ) हे पर्याय कॅनोनिकाल उपलब्ध करून देते, जे विंडोज बरोबर मिळते जुळते भासतात.
ह्याची इन्स्टॉल कार्याची पद्धत सुद्धा अत्यंत सोपी आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित मार्गदर्शन करते. इथे हार्डवेअर सपोर्ट सुद्धा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे आणि बरेचसे हार्डवेअर कंपनी जर लिनक्स साठी ड्राइवर बनवत असतील (किंवा इतर कोणी सुद्धा) तर ते सगळ्यात अर्धे उबंटू साठी ड्राइवर लिहितात.
४. MX लिनक्स

आपण जर www.distrowatch.com वर पहिले तर आपल्याला MX लिनक्स हा बरेच आठवडे सगळ्यात जास्त डाउनलोड होत असेलला डिस्ट्रो दिसेल. ह्याचे अनेक कारणं आहेत
- अत्यंत लाईटवेट डिस्ट्रो
- जुन्या संगणकासाठी अत्यंत उपयुक्त
- नवशिक्यांसाठी एक्दम उत्तम
- डेबियन वर आधारित त्यामुळे बरीच माहिती इंटरनेट वर उपलब्ध
मागे सांगितले तसे उबंटू हा डेबियन वर आधारित आहे. आणि इतर बरेच डिस्ट्रो (लिनक्स मिंट, झोरीन वगैरे) हे उबंटू वर आधारित आहेत. मात्र MX लिनक्स हे डायरेक्ट डेबियन वर आधारित आहे. त्यामुळे त्यात उबंटू एवढे नवीनतम सॉफ्टवेअर भेटणार नाही पण त्यामुळेच ते जास्त स्थिर असते.
नवीन हार्डवेअर त्यामुळे कदाचित त्यात सप्पोर्टेड नसेल कारण डेबियन स्थिरते वर जास्त लक्ष केंद्रित करते. ह्याचा अर्थ असा नाही कि MX लिनक्स हे नवीन संगणकासाठी उपयोगाचे नाही. लिनक्स मध्ये तुम्ही हवे ते चेंज करू शकता पण त्याला थोडे अधिक तांत्रिक ज्ञानाची गरज पडते.
५. लिनक्स लाईट

विंडोज ११ वापरासाठी एक सुधारित हार्डवेअर ची आवश्यता असते, त्यामुळे विंडोज १० वापरकर्त्यां साठी लिनक्स लाईट एक उपयुक्त अशी संगणक प्रणाली होऊ शकते. हे सुद्धा एक अतिशय हलके आणि सोपे असे लिनिक्स डिस्ट्रो आहे.
लिनक्स लाइट विंडोज वापरकर्त्यांना, त्याच्या टास्कबार, विंडोज-प्रेरित वॉलपेपर आणि लिबरे ऑफिस सूटसह बरेच काही देऊ करून; विंडोज सारख्या समान UI ने लक्ष्य करते. त्यामुळे ते नवीनच नाही तर पूर्व विंडोज वापरकर्त्यांसाठी अगदी उपयुक्त ठरते. हे वितरण चालवण्यासाठी तुम्हाला तुमची प्रणाली अपग्रेड करण्याची गरज नाही. लिनक्स लाइटने जुन्या हार्डवेअर मध्ये सुद्धा उत्तम प्रकारे कार्य केले पाहिजे.
याशिवाय, हे विशेषत: नवीन वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेल्या अनेक इन-हाउस युटिलिटी आणते. उदाहरणार्थ, लिनक्समध्ये टर्मिनल कसे वापरावे किंवा सिस्टम अपग्रेड कसे करावे हे नवशिक्याला माहित नसेल. त्यामुळे, लिनक्स लाइटमध्ये दैनंदिन प्रणाली आणि देखभाल कार्याची काळजी घेण्यासाठी अनेक ग्राफिकल टूल्स आहेत.
६. एलिमेंटरी (ElementaryOS)

आपण आतापर्यंत फक्त विंडोज वापरकर्त्यांसाठी सोपे असे लिनक्स बघत आलो आहोत. पण बरेचशे असे आहेत कि जे ॲपल चे MAC OS वापरात होते आणि आता त्यांचा ॲपल संगणक पूर्वी सारखा चालत नाही. कारण तेच, जे विंडोज संगणकासाठी आपण वाचले आहे.
एलिमेंटरी प्रणाली त्याच्या लूक आणि डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. लिनक्समध्ये सौंदर्यशास्त्र आणि स्थिरता यांचे मिश्रण हवे हे एक सर्वोत्तम डिस्ट्रो आहे. हे डिस्ट्रो मॅकओएस आणि त्याच्या डिझाइन तत्त्वाद्वारे बऱ्याच प्रमाणात प्रेरित आहे. जर तुम्ही macOS वापरकर्ते असाल आणि लिनक्सच्या जगात उडी घ्यायची असेल, तर ही एक परिपूर्ण डिस्ट्रो आहे.
त्याच्या मुळात, हे उबंटू च्या दीर्घकालीन आवृत्त्यांवर आधारित आहे, जे तुम्हाला विस्तारित सप्पोर्ट 5 वर्षांहून अधिक काळ देते आणि आवश्यक सुरक्षा आणि बग फिक्स देते.
एलिमेंटरी मध्ये सॉफ्टवेअर सेन्टर हे सुद्धा ॲपल सारखे ‘ॲप सेन्टर’ म्हणून नामांकरीत आहे. बरेचसे ॲप आयकॉन सुद्धा मॅक सारखे दिसतात जेणेकरून वापरकर्त्याला हे अगदी नेहमीच्या त्याच्या मॅक सारखे वाटते.
७. पॉप ओएस (POP OS!)

पॉप ओएस हे, अमेरिकन संगणक उत्पादक System76 द्वारे हार्डवेअर लाइन-अपसाठी, तयार केलेले लिनक्स वितरण आहे. जरी हे प्रामुख्याने त्याच्या हार्डवेअरसाठी डिझाइन केलेले असले तरी ते डाउनलोड आणि वापरण्यासाठी विनामूल्य आहे.
नवीन वापरकर्त्यासाठी हे योग्य आहे असे मला वाटते याचे प्राथमिक कारण म्हणजे ते एक शक्तिशाली डिस्ट्रो म्हणून डिझाइन केलेले आहे जे आधुनिक ग्राफिक्स कार्ड लाइन-अप आणि AI-ML वर्कलोडसह चांगले कार्य करते. याव्यतिरिक्त, पॉप OS मध्ये NVIDIA कार्ड्ससाठी समर्पित इंस्टॉलर देखील आहे जेणेकरुन तुम्हाला ड्रायव्हर्स इन्स्टॉल करण्यात वेळ घालवण्याची आवश्यकता नाही.
याशिवाय, पॉप ओएस चा कस्टमाइज केलेला “COSMIC डेस्कटॉप”, त्याच्या अंगभूत टाइलिंग वैशिष्ट्ये, उत्तम प्रकारे डिझाइन केलेली सिस्टम ट्रे आणि “पॉप शॉप” नावाची ऍप्लिकेशन भांडार या साठी वाखाणला जातो.
पॉप शॉप हे एक आकर्षक ॲप आहे जे तुम्हाला तुमच्या वापराच्या गरजेनुसार वर्गीकृत हजारो ॲपमध्ये सहज शोधून देते – अभ्यास, इंटरनेट. व्हिडिओ, गेमिंग इत्यादी.
शेवटी, त्याच्या लोकप्रियतेमुळे, HP आणि लिनोवो सारख्या अनेक आघाडीच्या संगणक उत्पादकांनी विंडोज ऐवजी डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टम म्हणून Pop OS सह अनेक लॅपटॉप मॉडेल्स लाँच केले.
त्यामुळे, नवशिक्या लिनक्स डिस्ट्रो म्हणून पॉप ओएस हे ॲपलच्या मॅक OS ला एक चांगला पर्याय ठरू शकते.
