• June 29, 2026

NPL-Tech

Noob Plays and Learns Technology

लिनक्स – काही आवश्यक ॲप्लिकेशन्स 

लिनिक्सच्या यशामध्ये एक महत्वाचे कारण म्हणजे ते विनामूल्य आहे हे. आणि त्याचप्रमाणे, लिनिक्सवर आधारित अनेक सॉफ्टवेअर सुद्धा तुम्हाला विनामूल्य भेटतील, जे तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये तुमचे असंख्य पैसे तर वाचवतीलच, पण तुम्हाला तुमचे कामकाज जास्त कार्यक्षम तऱ्हेने करण्यास मदत सुद्धा करतील. अर्थात काही व्यावसायिक सॉफ्टवेअर साठी पैसे मोजावे लागतात पण त्यात सुद्धा तुम्हाला बरेचसे सॉफ्टवेअर विनामूल्य मिळू शकते. अर्थात ह्या लेखाचे लक्ष हे घरगुती वापरासाठी किंवा छोट्या व्यावसायिकांसाठी आहे, ज्यांचे बजेट मोठमोठया कंपन्यांप्रमाणे प्रमाणे नसते. 

लिनक्स हे एक पर्यायाने भरलेले जग आहे.  आपण मागे पाहिले आहे की जर एखादा आपल्याला एखादा डिस्ट्रो आवडला नाही, तर आपण दुसरा डिस्ट्रो  वापरू शकतो. उदाहरणार्थ लीनक्स मिंट आवडले नाही तर आपण उबुंटू वापरू शकता.  तसेच एखादा म्युझिक प्लेअर आवडला नाही तर आपण दुसरा म्युझिक प्लेअर सिलेक्ट करू शकता कारण लिनक्समध्ये डझनावरी म्युझिक प्लेअर तुम्हाला उपलब्ध होऊ शकता . अर्थात एखादी गोष्ट निवडताना ती आपल्यासाठी परिपूर्ण असेल का नाही ते आपल्याला वापरल्याशिवाय सांगता येणार नाही. काही ॲप्लिकेशन्स मध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या काही खुबी असतीलही किंवा नसतीलही.  म्हणूनच आपल्या पसंतीला पडेल असे एप्लीकेशन निवडणे हे गोंधळात टाकण्याचं काम आहे.  आपला हा गोंधळ निस्तरण्यासाठीच आम्ही या लेखांमध्ये असे काही एप्लीकेशन्स निवडले आहेत की ज्याने आपल्या बहुतांशी गरजा पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे. 

बहुतांशी सर्व लिनक्स डिस्ट्रो मध्ये बरेचसे दैनंदिन जीवनात लागणारे सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करतानाच मिळून जाते. पण लिनक्स म्हणजे चॉईस. आपल्याला एखादी  गोष्ट किंवा  एखादे सॉफ्टवेअर आवडले नाही तर ते काढून दुसरे निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. विंडोज किंवा मॅकOS मध्ये तुम्ही नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता पण त्यांचे बरेच ॲप्लिकेशन्स तुम्ही अनइंस्टॉल किंवा काढून टाकू शकत नाहीत.  कधी “विंडोज फाईल एक्सप्लोरर”  काढायचा प्रयत्न करून पाहिलात?

पण लिनक्स मध्ये ते स्वातंत्र्य असते. आपल्याला डिस्ट्रोने दिलेले फाईल मॅनेजर आवडले नाही, परफॉर्मन्स मॉनिटर आवडले नाही. अगदी त्याचे कमांड लाईन साठी लागणारे टर्मिनल ऍप्लिकेशन सुद्धा.

नवीन लीनक्स युजरसाठी काही महत्वाचे ॲप्लिकेशन्स

ज्या वापरकर्त्याने संगणकाची सुरुवात ही नुकतीच केलेली आहे आणि त्यासाठी जर का त्याने लिनक्स निवडले असेल तर त्याला ते समजून घेणे हे थोडे सोपे असते.  अर्थात एखाद्या वापरकर्त्याने जर बरीच वर्ष विंडोज वापरले असेल तर तो थोडा गोंधळात जाऊ शकतो कारण बरेचसे विंडोज साठी लिहिलेले ॲप्लिकेशन्स त्याला इथे सापडत नाहीत.  अर्थात अशा युजरने गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही कारण लिनक्समध्ये लाखोंनी एप्लीकेशन आहेत जे विंडोजच्या एप्लीकेशन सारखे किंवा त्यांच्याही पेक्षा चांगल्या तऱ्हेने तुम्हाला दैनंदिन कामकाजात मदत करू शकतात.  अशाच काही महत्त्वाच्या एप्लिकेशन्स ची यादी आम्ही वर्गीकरणानुसार आपणासाठी घेऊन आलो आहोत.

१. वेब ब्राउझर

जागतिक आकडेवारीत संगणकाच्या वापरकर्त्याचा एकूण संगणक वापरापैकीच्या  92% वेळ हा ई-मेल , सोशल मीडिया आणि सर्च करण्यात जातो. विंडोज वर  गुगल क्रोम (Google Chrome) आणि मायक्रोसॉफ्ट एज (Edge) हे ब्राउजर वापरात अग्रगण्य आहेत. अर्थात विंडोज आणि गुगल हे वापरकार्यातची माहिती गोळा करण्यात सुद्धा अग्रगण्य आहेत. त्यामुळे आपण इंटरनेट वर काय करतो पासून, आपण कुठला ब्राउजर वापरतो, कुठला कॉम्पुटर वापरतो, कुठल्या देशातून आपण लॉग इन करतो ह्या सर्व बाबीच्या नोंदी त्यांच्याकडे आपण अनाहूतपणे पाठवत असतो. ह्याचा अर्थ असा नाही कि आपण हे ब्राउजर लिनिक्सवर वापरू शकत नाही. लिनक्स मध्ये सुद्धा तुम्ही हे दोन्ही ब्राउजर इन्स्टॉल करू शकता. 

लिनक्सचे मूलतः तत्व हे युजर प्रायव्हसी (वापरकर्त्यांची गोपनीयता) ह्यावर अवलंबुन आहे. त्यामुळे इथे जे ब्राउजर ह्या नोंदी कुठल्याही कंपनीला पाठवत नाहीत त्यांना जास्त अवलंबले जाते. ह्याव्यतिरिक्त परफॉर्मन्स आणि स्पीड ह्यांना सुद्धा महत्व दिले जाते. शिवाय आपण पहिल्या प्रमाणे जुने  संगणक, ज्यांची रॅम कॅपॅसिटी (क्षमता) कमी असते अशा संगणकावर सुद्धा चालणारे ब्राउजर इथे उपलब्ध असतात. अगदी कमांड लाईन वापरून सुद्धा इंटरनेट वरची माहिती गोळा करणारे lynx सारखे ब्राउजर सुद्धा इथे उपलब्ध आहेत. 

ह्यातील काही अग्रगण्य ब्राउजर खाली नमूद केले आहेत

फायरफॉक्स (Firefox)

फायरफॉक्स हा लिनक्स मधला आणि विंडोज मधला सुद्धा एक नावाजलेला ब्राउजर आहे. ह्याचे कारण त्याची विश्वासार्हयता; त्यांनी आपल्या गोपनीयते आणि परफॉर्मन्सच्या जोरावर मिळवली आहे. ओपन सोर्स असल्यामुळे फायरफॉक्स ला आपल्या युजर समुदायाकडून बरीच मदत मिळते जेणे करून एखादे सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड करणारे बग सापडले तर त्याचे लवकर निवारण करता येते. क्रोम प्रमाणे फायरफॉक्स मध्ये सुद्धा असंख्य एक्सटेंशन सपोर्ट आहे. आणि आपल्याला त्याचे लूक बदलण्यासाठी बरेच थिम आणि थर्ड पार्टी सपोर्ट सुद्धा मिळतात. 

मोझिला संस्थेने २००४ साली प्रथम निर्माण केलेले फायरफॉक्स हे गेको (Gecko ) इंजिन वर आधारित आहे. लिनक्स वरच नाही तर जगातील अनेक तंत्रप्रणाली साठी हे उपलब्ध करून देण्यात आले आहे. जसे कि लिनक्स व्यतिरिक्त विंडोज, ॲपलचे मॅक OS आणि iOS, गुगलचे क्रोमबुक आणि अँड्रॉइड, यूनिक्स इत्यादी. 
अधिक माहिती साठी https://www.mozilla.org/en-US/firefox/new/ इथे भेट द्या.

ब्रेव्ह (Brave)

लिनक्स मध्ये बरेचशे ब्राउजर हे प्रायव्हसी फोकस्ड आहेत ह्यात वादच नाही कारण ते एकंदरीत त्याचे तत्त्वच आहेत. मात्र ब्रेव्ह ह्यात सगळ्यात अग्रगण्य मानला जातो कारण ते गोयनीयता राखण्यात अजून सुधारणा करते. म्हणूनच, अधिक खाजगी आणि सुरक्षित ब्राउझिंग अनुभवासाठी ते डीफॉल्टनुसार जाहिराती, कुकीज आणि वेबसाइट ट्रॅकर्स डिफॉल्ट मध्येच रोखून टाकते. तुमची माहिती कशी हाताळली जात आहे हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही गोपनीयता सेटिंग्ज आणखी ट्यून करू शकता. 

ह्यात जाहिराती रोखण्याचे तंत्र अंतर्गतच आहे. ज्यामुळे तुमचे वेब पेज जास्त फास्ट लोड होतात आणि जे कन्टेन्ट आहे ते वाचनीयतेच्या दृष्टीनी अजून चांगले होते. ब्रेव्ह ब्राउजर प्रत्येक वेब-साईटला आपोआपच https मध्ये रूपांतरित करते ज्याने वेबसाईट आणि तुमच्या मधला सर्व डेटा हा गोपनीय राहतो. आणि त्यामुळे आपल्या डेटा बरोबर कोणाला छेडछाड करता येत नाही आणि कोणाला आपला डेटा वाचता (ह्याला इव्हस्ड्रॉपिंग म्हणतात) येत नाही. 
अधिक माहितीसाठी www.brave.com इथे भेट द्या. 

विवाल्डी (Vivaldi)

जरी ब्राउज़र जगतात हे नवीन असले तरी,  विवाल्डीने स्वतःला लिनक्ससाठी सर्वोत्तम ब्राउझरपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. 2015 मध्ये Vivaldi Technologies द्वारे सौंदर्यदृष्ट्या-आनंद देणारा ब्राउझर रिलीज करण्यात आला.

हा एक फ्रीवेअर प्रोग्राम आहे जो क्रोमियम-ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मसह ऑपेरा-सारखा इंटरफेस समाविष्ट करतो. हे सॉफ्टवेअर ऑपेरा ब्राउझरची आठवण करून देणारे आहे हे आश्चर्यकारक नाही, कारण त्याच्या मूळ कंपनीच्या सह-संस्थापकाने यापूर्वी Opera सॉफ्टवेअरची सह-संस्थापना केली होती.

Vivaldi वेब तंत्रज्ञानावर विकसित केले आहे. शिकायला थोडे लावणारे असले तरी, हे सर्वात स्वच्छ आणि वैशिष्ट्यपूर्ण लिनक्स ब्राउझरपैकी एक आहे.ह्याच्या डिजाईन फिलॉसॉफी मध्ये सर्वसमावेशक असे धोरण आहे. जेणेकरून आपल्याला निव्वळ ब्राउजर नाही तर, ई-मेल, कॅलेंडर, डाउनलोड, मीडिया प्लेअर, नोट टेकिंग अशा सगळ्या गोष्टी साठी ब्राउजर मधून बाहेर जाण्याची गरज पडत नाही. एका क्लिक मध्ये आपल्याला हे सगळे उपलब्ध होते. 
अधिक माहिती साठी www.vivaldi.com इथे भेट द्या.

Courtesy : Vivaldi

२. ई-मेल क्लायंट

2025  मध्ये असा अंदाज आहे कि साधारण 450 कोटी लोकं हे ई-मेल चा वापर करतील. ह्यातील बहुतांशी सर्व वेब बेस्ड (जसे जीमेल / GMail) ई-मेल क्लायंट वापरतील. मात्र वेब बेस्ड क्लायंट हे जास्त कार्यक्षम मानले जात नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे ते तुमच्या इंटरनेट वर अवलंबुन असते. दुसरे तुमच्याकडे एका पेक्षा जास्त ई-मेल ऍड्रेस असतील (जसे व्यावसायिक , वैयक्तिक आणि इतर ) तर तुम्हाला एका ई-मेल मधून लॉग आऊट करून दुसरे ई-मेल लॉगिन करावे लागते, जे अकार्यक्षम वाटते. अथवा वेगवेगळ्या ब्राउजर मध्ये वेगवेगळे ई-मेल उघडून ठेवावे लागते. ज्याने आपल्या संगणकाची मेमरी वाया जाते. 

हेच कारण आहे कि बरेच वापरकर्ते डेस्कटॉप ई-मेल क्लायंट चा वापर करतात. ह्याने कार्यक्षमता तर वाढतेच पण आपल्याला एकाच क्लायंट मध्ये आपले सर्व ई-मेल मिळून जातात. ह्या व्यतिरिक्त बरेच ई-मेल क्लायंट तुम्हाला थिम आणि प्लग इन देतात, पॉवरफुल सॉर्टींग आणि सर्च फंक्शन देतात जे आपली कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.

थंडरबर्ड (Thunderbird)

फायरफॉक्स निर्माते मोझिला संस्थे कडूनच एक क्रॉस-प्लॅटफॉर्म आणि शक्तिशाली असे थंडरबर्ड नावाचे ई-मेल क्लायंट विकसित करण्यात आलेले आहे. बऱ्याचशा लिनक्स डिस्ट्रो मध्ये हे डिफॉल्ट ई-मेल क्लायंट मिळते.

ह्यातील सेटअप विझार्ड आपल्याला नवीन ईमेल ॲड्रेस तयार करण्यास  किंवा तुमचा अस्तित्वात असलेला ई-मेल ॲड्रेस सेट अप करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतो. थंडरबर्डच्या डेटाबेसमध्ये सर्व सामान्य ईमेल प्रोव्हायडर (जसे GMAIL / Outlook / Yahoo )  सेटिंग्ज आहेत आणि तुम्ही तुम्हाला हवे तितकी ईमेल खाती तुम्ही त्यात जोडू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्यात तुम्हाला यूनिफाईड ई-मेल नामक एक कार्य सापडते जे तुमची सर्व ई-मेल खाती एकाच ठिकाणी गोळा करते जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या फोल्डर मध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही.

फायरफॉक्स प्रमाणे, थंडरबर्ड मध्ये सुद्धा, आपल्या कार्यशैली नुसार कॅस्टमाइझ करण्यासाठी वेगवेगळ्या थीम आणि ॲड-ऑन किंवा तुमचे मेल फोल्डर्स आपल्या गरजेनुसार वर्गीकृत करण्याचे उत्तम मार्ग देऊ केलेले आहेत. यापैकी सर्वात उपयुक्त म्हणजे निःसंशयपणे लाइटनिंग एक्स्टेंशन आहे जे ईमेल क्लायंटमध्ये पूर्णपणे कार्यरत कॅलेंडर जोडते.

तुमचे सर्व ईमेल आणि संपर्क, स्थानिक पातळीवर (हार्डडिस्क वर) संग्रहित करून, तुम्हाला कधीही इंटरनेट कनेक्शन शिवाय काम करण्याची आवश्यकता असल्यास थंडरबर्ड हा एक उत्तम पर्याय आहे.

मेल स्प्रिंग (Mailspring)

मेलस्प्रिंग हा त्यामानाने नवीन ई-मेल क्लायंट जरी असला तरी फार झपाट्याने त्याचा प्रसार झाला आहे. लिनक्स प्रमाणे विंडोज आणि मॅक वर सुद्धा ते उपलब्ध आहे. 

ह्याचे फिचर बरेच प्रगत आणि वैविध्यपूर्ण आहेत. यात युनिफाइड इनबॉक्स आहे, जो वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी अनेक ईमेल खाती अखंडपणे व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. मेलस्प्रिंग आपल्या विविध थीम आणि लेआउटसह  दिसायला आकर्षक अशा इंटरफेसचा अभिमान बाळगतो. त्यामध्ये वाचन पावत्या (रीड रिसिप्ट) , ईमेल शेड्युलिंग, स्नूझिंग, लोकॅलायझेशन आणि मेल मर्ज यांसारखी कार्यक्षमता वाढवणारी अनेक साधने समाविष्ट आहेत.

मायक्रोसॉफ्ट एक्सचेन्ज साठी मात्र ह्यात सपोर्ट नाही जो आपल्याला दुसऱ्या दोन पर्यायांमध्ये सापडतो.

इवोल्युशन (Evolution)

बऱ्याच ग्नोम (GNOME) अधोरेखित लिनक्स मध्ये आपल्याला इवोल्युशन हा ई-मेल क्लायंट सापडेल. दिसायला जरी तो थंडरबर्ड किंवा मेलस्प्रिंग एवढा आकर्षक नसला तरी त्यात असलेल्या कार्यक्षमता साधनांनी त्याला एक आऊटलूक सारखे कंप्लिट पॅकेज बनवले आहे. 

मायक्रोसॉफ्ट एक्सचेन्ज साठी हे अतिशय उत्तम क्लायंट आहे. ह्यात ई-मेल, कॉन्टॅक्ट, कॅलेंडर, नोट, टास्क अशा सगळ्या बाबींची सोय आहे ज्यामुळे हे एक परिपूर्ण असे ई-मेल ॲप्लिकेशन बनते. 

जर तुमचा डिस्ट्रो ग्नोम व्यतिरिक्त इतर कुठला तरी असेल तर हे इन्स्टॉल करणे थोडे किचकट आहे. ह्याला पर्याय म्हणून KDE डेस्कटॉप चे K-Mail नामक ॲप्लिकेशन ठरू शकते.

३. म्युजिक प्लेअर 

विंडोज असो वा मॅक किंवा लिनक्स – संगीताची आवड हि बऱ्याच अंशी प्रत्येक वापरकर्त्याला असते. मात्र हल्ली इंटरनेट वरील ऍमेझॉन म्युसिक, स्पॉटीफाय, ॲपल म्युसिक, गाना अश्या असंख्य स्ट्रीमिंग सर्विस मुळे CD किंवा गाणे डाउनलोड करून ऐकणे थोडे कमीच झाले आहे. मात्र ज्यांना हाय क्वालिटी संगीत अथवा ऑफलाईन ऐकणाऱ्यांची संख्या सुद्धा बरीच आहे

क्लेमेंटाईन (Clementine)

क्लेमेंटाईन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह एक फार जुने संगीत प्लेयर आहे. हे एक जलद आणि सोपे युजर इंटरफेसने युक्त आहे जे तुमचे प्लेलिस्ट व्यवस्थापन सोपे करते.

तुम्ही याचा वापर इंटरनेट रेडिओ प्ले करण्यासाठी, अल्बम आर्ट, संगीत , पॉडकास्ट आणि बरेच काही डाउनलोड करण्यासाठी करू शकता. क्लेमेंटाइन विंडोज आणि मॅकवर देखील उपलब्ध आहे. तर, तुम्ही ते तुमच्या सर्व मशीनवर वापरू शकता.

मात्र 2016 पासून ह्यात फार डेव्हलोपमेंट झाली नाही – हल्ली त्यावर आधारित असे नवीन स्ट्रॉबेरी (Strawberry) म्युसिक प्लेअर हे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते.  

एलिसा (Elisa)

तुम्हाला वेगवान, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण संगीत प्लेअर हवे असल्यास एलिसा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. हे तुम्हाला लेआउट आपल्या सोयीनुसार करण्याचे काही नियंत्रण देते, ह्यात तुम्ही तुम्हाला सर्व उपलब्ध पर्याय निवडू शकता किंवा संगीत प्ले करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इमर्सिव्ह मोड सुद्धा पर्याय म्हणून निवडू शकता. 

एलिसा हा KDE द्वारे विकसित केलेला एक अप्रतिम म्युसिक प्लेअर आहे. मुख्यतः, हे केडीई-संचालित वितरणासाठी तयार केले आहे, परंतु ते इतर लिनक्स वितरणांवर सुद्धा चांगले कार्य करते. 

हे लिनक्स, बीएसडी आणि विंडोजसाठी उपलब्ध आहे. लिनक्ससाठी, तुम्हाला ते प्रमुख वितरणांच्या अधिकृत सॉफ्टवेअर स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. किंवा तुम्ही ते टर्मिनलद्वारे सुद्धा इंस्टॉल करू शकता.

 रिदम बॉक्स (Rhythm Box)

रिदम बॉक्स हे  ॲपलच्या  iTunes द्वारे प्रेरित एक सुंदर संगीत प्लेअर आहे. जरी GNOME डेस्कटॉप हे ह्याचे प्रमुख उद्दिष्ट असले, तरी ते बर्‍याच लिनक्स डेस्कटॉप वातावरणात उत्तम प्रकारे चालते. 

त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये मजबूत प्लेलिस्ट व्यवस्थापन, बर्निंग ऑडिओ (CD / DVD बनवणे ), DAAP (The Digital Audio Access Protocol – नेटवर्क वर ऑडिओ शेअर करण्यासाठी ॲपलने तयार केलेले एक प्रोप्रायटरी प्रोटोकॉल), पॉडकास्टिंग आणि रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे.

तुम्ही अतिरिक्त कार्यक्षमता जोडण्यासाठी ह्यात विविध प्लगइन सुद्धा वापरू शकता. रिदम बॉक्स  चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे Nautilus सारख्या फाईल मॅनेजर किंवा Pidgin, आणि XChat सारख्या चॅट ॲप्लिकेशन बरोबर सफाईतपणे इंटिग्रेट करण्याची त्याची क्षमता. 

हा एक साधा तरी वैशिष्ट्यपूर्ण असा  प्लेअर आहे जिथे तुम्ही इंटरनेट रेडिओचा इथूनच आनंद घेऊ शकता, संगीत लायब्ररी व्यवस्थापित करू शकता आणि Last.fm आणि Magnatune सारख्या स्ट्रीमिंग संगीत सेवा ह्या सुद्धा वापरू शकता.

४. विडिओ प्लेअर 

जी गत म्युसिक प्लेअर ची तीच गत विडिओ प्लेअरचीसुद्धा आहे. नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राईम विडिओ, हॉटस्टार असे असंख्य स्ट्रीमिंग विडिओ सर्विस मुळे आपण आपली चित्रपट, सिरीयल यांची आवड कुठल्याही ब्राउजर मध्ये पूर्ण करू शकतो.   मात्र तरी सुद्धा तुम्ही डाउनलोड केलेले अथवा जुने CD / DVD असलेले चित्रपट किंवा आपल्या एखाद्या समारंभाचे चित्रीकरण पाहायचे झाल्यास आपल्याला विडिओ प्लेअरची आवश्यकता पडतेच. 

तुमच्या लिनक्स डिस्ट्रो मध्ये एखादा तरी विडिओ प्लेअर असेल पण तरी सुद्धा काही नावाजलेले विडिओ प्लेअर आम्ही तुमच्यासाठी खाली निवडलेले आहेत त्यांच्या काही ठळक वैशिष्ट्यांसाठी

VLC मीडिया प्लेअर

2001 मध्ये VideoLAN प्रकल्पांतर्गत रिलीझ झालेला, VLC Media Player हा सर्वात जास्त नसला तरी सर्व  शक्तिशाली मीडिया प्लेयर्सपैकी एक आहे जो Linux, Windows, Solaris, Android, iOS, Syllable इत्यादिंसह पण एवढ्या पुरताच मर्यादित नसलेल्या अनेक OS वर उपलब्ध आहे.

व्हीएलसी मीडिया प्लेयर हा निर्विवादपणे सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स व्हिडिओ प्लेयर आहे. फक्त लिनक्सपुरतेच मर्यादित नाही—पण प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी (विंडोजसह) व्हिडिओ प्लेअर असणे आवश्यक आहे.

हा एक जोरदार शक्तिशाली व्हिडिओ प्लेयर आहे जो विविध फाइल स्वरूप आणि कोडेक्स हाताळण्यास सक्षम आहे. वेगवेगळी स्किन वापरून आणि विशिष्ट एक्स्टेंशनच्या मदतीने  तुम्ही ह्याची कार्यक्षमता वाढवून तुम्हाला हवे तसे त्याचे स्वरूप करू शकता. Subtitle  सिंक्रोनाइझेशन, ऑडिओ/व्हिडिओ फिल्टर इ.सारखी इतर वैशिष्ट्ये देखील इथे उपलब्ध आहेत.योग्य URL द्वारे तुम्ही थेट व्हिडिओ प्रवाह प्ले करण्याची क्षमता ह्यात आहे आणि ते एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर आहे VLC मध्ये.

MPV प्लेअर 

जर तुम्ही मॅक OS मधील क्विकटाईम प्लेअर वापरला असेल तर MPV तुम्हाला नक्कीच त्याची आठवण करू देईल. ह्याचा युजर इंटरफेस हा त्याहून सुद्धा किमान फिचर असलेला आहे. ह्याचे एकमेव काम म्हणजे विडिओ चालवणे. (ते सुद्धा वेगवेगळ्या कोडेकचा सपोर्ट असेलेले). गुणवत्ता, वापरण्यास सुलभता आणि एक सुंदर किमान इंटरफेस जो तुम्हाला तुमचे व्हिडिओ विचलित न होता पाहू देतो.

इंटरफसचे म्हणायचे झाले तर, तुम्हाला प्लेबॅक कंट्रोल, फुलस्क्रीन बटण, ट्रॅक किंवा विडिओ ची वेळ दाखवणारे  बार आणि ऑडिओ ट्रॅक आणि सबटायटल ट्रॅकसाठी निवडक या व्यतिरिक्त अजून काही जास्त मिळत नाही. यात आपल्याला विडिओ पाहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही आहे आणि अवांतर काही सुद्धा नाही. 

क्रॉस प्लॅटफॉर्म असण्याखेरीच ह्यात विडिओ स्केलिंग द्वारे विडिओ अजून हाय-क्वालिटी करून आपला आनंद द्विगुणित करते.

GNOME व्हिडिओज

पूर्वी टोटेम म्हणून ओळखला जाणारा, हा व्हिडिओ प्लेयर सर्वोत्तम लिनक्स सॉफ्टवेअर पैकी एक आहे. नावाप्रमाणेच, ग्नोम डेस्कटॉप साठी हा डीफॉल्ट व्हिडिओ प्लेअर आहे. 

ग्नोम व्हिडिओ कोणत्याही मार्गाने स्वतःला काही खास असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. इतर विडिओ प्लेअर सारखे कस्टमायझेशनच्या मार्गाने तुम्हाला हवे तसे दिसण्याचे वैशिष्ठ्य सुद्धा त्यात नाही.  त्याऐवजी, त्याचा एकमेव उद्देश व्हिडिओ फाइल्स कोणत्याही अडथळ्याशिवाय प्ले करणे हा आहे – जे ते निर्दोषपणे करते. त्याशिवाय रिदम बॉक्स सारखे तुम्ही ह्याला नॉटिलस सारख्या फाईल मॅनेजर आणि  इतर GNOME घटकांसह व्यवस्थित इंटिग्रेट करू शकता. 

ग्नोम व्हिडिओ थेट VLC प्लेअर सारखे विस्तृत  कोडेक्सच्या सपोर्टसह येत नाहीत, परंतु जर तुम्ही योग्य कोडेक नसलेला व्हिडिओ प्ले करण्याचा प्रयत्न केला तर, व्हिडिओ तुम्हाला एका-क्लिक द्वारे कोडेक इंस्टॉल, सोल्यूशनसह सूचित करेल. 

इतर वैशिष्ट्यांमध्ये प्लेलिस्ट साइडबार (जे टॉगल केले जाऊ शकते), किमान इंटरफेस आणि अंगभूत YouTube सर्च  समाविष्ट आहे जे तुम्हाला कधीही व्हिडिओ न सोडता YouTube व्हिडिओ (तसेच संबंधित व्हिडिओ) ब्राउझ आणि प्ले करण्यास अनुमती देते.

तुम्ही तुमच्या डेस्कटॉपसाठी वापरण्यास सोपा व्हिडिओ प्लेयर शोधत असल्यास, GNOME व्हिडिओ पहा. तुम्हाला सर्वोत्तम आणि सोपा विडिओ प्लेअर मिळाल्याचे समाधान मिळू शकेल.

५. डॉक्युमेंट, स्प्रेडशिट आणि प्रेसेंटेशन सॉफ्टवेअर

डॉक्युमेण्ट मॅनेजमेंट, स्प्रेडशीट आणि प्रेसेंटेशन हे आजच्या घटकेतले अविभाज्य घटक आहेत. घर असो किंवा छोटे बिझनेस, आपल्याला ह्याची आवश्यकता भासतेच. मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे आवडो अथवा न आवडो, आज त्याची मक्तेदारी मान्य करावीच लागेल. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे आज एक अतिशय पॉवरफुल आणि नेटके असे ऑफिस सॉफ्टवेअर संच आहे. मात्र त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. मात्र तुम्ही त्याची वेब आवृत्ती वापरू शकता जी तेवढी पॉवरफुल नाही. ह्याला गूगल डॉक्युमेंट सुद्धा पर्याय आहे. 

आणि हे दोन्ही ऑपशन आपण लिनक्स मध्ये सुद्धा वापरू शकतो, मात्र एका ऑफिस संचाची ताकद वेगळीच असते. आणि लिनक्स मध्ये आपल्याला बरेच चांगले असे ऑफिस सॉफ्टवेअर संच भेटतात. मात्र नुसते त्यात फिचर असून चालत नाहीत तर त्याच बरोबर आपल्याला हे सुद्धा पहिले पाहिजे कि त्यांची मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे डॉक्युमेंट अनुरूपता / साधर्म्य (Compatibility) किती आहे. कारण डॉक्युमेंट हे निव्वळ आपल्या वापरासाठी नसते तर त्याची देवाण घेवाण होते. आणि समोरच्या सॉफ्टवेअरला ते उघडता आले पाहिजे अथवा त्याचे फॉरमॅटिंग व्यवस्थित दिसले पाहिजे.

लिबरे ऑफिस (LibreOffice)

आज लिनक्ससाठी MS Office साठी अनुरूप पर्याय म्हणून लिबरे ऑफिस हा सहजपणे सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. 2011 मध्ये OpenOffice.org च्या फोर्कच्या रूपात हे रिलीज झाले होते. सहकारी तत्वावर विकास प्रक्रिया अशा तत्वावर विकसित करण्याच्या ह्या प्रक्रियेमुळे आज जगभरातील शेकडो डेव्हलपरनी  LibreOffice ला प्रचंड गतिमान तर्हेने योगदान करून त्याला ह्या उंचीवर पोहोचवले आहे 

लिबरे ऑफिसमध्ये खालील ऍप्लिकेशन्स असतात:

Writer : मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखे, आपल्या लिखाणाला एक उत्कृस्ट पर्याय. 

Calc: मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा हा पर्याय व्यावसायिक वैशिष्ट्यांसह परिपूर्ण असून ह्यात तुम्ही स्प्रेडशीट पासून, कॉर्पोरेट डेटाबेससह इंटेग्रेशन, असे सर्व करू शकता.

Impress : मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट साठी असलेल्या ह्या पर्यायामध्ये आपण टेक्स्ट, इमेज ऍनिमेशन, बुलेट पॉइंट, रेखाचित्रे आणि इतर घटकांसह स्लाइड्स सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

Draw :  300 सेमी x  300 सेमी कमाल पृष्ठ आकारासह आकृती (Diagram)आणि फ्लोचार्टिंग साधन.

Math : एक फॉर्मुला एडिटर  जो आपल्याला इतर LibreOffice घटकांसोबत जोडून आपल्याला डॉक्युमेंट  स्प्रेडशीट्स आणि सादरीकरणांमध्ये गणितीय आणि वैज्ञानिक सूत्रे समाविष्ट करण्यास मदत करतो.

Base : MySQL/MariaDB, Adabas D, MS Access आणि PostgreSQL मध्ये इंटेग्रेट करण्यासाठी एक डेस्कटॉप डेटाबेस फ्रंट-एंड

मायक्रोसॉफ्ट ऑफिस केवळ फीचरच्या दृष्टीने परिपूर्ण नाही पण कालांतराने ते दिसण्याच्या दृष्टीने सुद्धा सुंदर झाले आहे. त्याचे सध्याचे रिबन बेस्ड लुक जर आपल्याला आवडत असेल तर लिबरे ऑफिसचे डिसाईन आपल्याला थोडे जुनाट वाटेल (मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2003 सारखे )

ओन्ली ऑफिस (OnlyOffice)

ओन्लीऑफिस हे Ascensio System SIA ने निर्माण केलेले, लिबरे ऑफिस सारखे सहयोगी तत्वावर आधारित ओपन सोर्स ऑफिस सॉफ्टवेअर संच आहे. लिबरे ऑफिसच्या मानाने हे नवीन आहे. मात्र यातसुद्धा तुम्हाला एक परिपूर्ण असे ऑफिस सॉफ्टवेअर संच उपलब्ध आहे. खास करून ह्याची मायक्रोसॉफ्ट ऑफिस बरोबरचे साधर्म्य आणि क्लाउड-इंटिग्रेटेड सहाय्य जे आपल्याला आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकाच वेळी एडिट करण्याची सोय होते.  

OnlyOffice फक्त Linux वरच नाही तर सर्व प्रमुख OS प्लॅटफॉर्मवर कार्य करते आणि. ह्या ऑफिस सॉफ्टवेअर संचामध्ये सुद्धा सर्व वैशिष्ट्यांनी युक्त डॉक्युमेंट मॅनेजमेंट,  स्प्रेडशीट्स, प्रेसेंटेशनआणि फॉर्म निर्मिती/संपादन करणारी सर्व साधने उपलब्ध आहेत. ह्याची प्लगइन लायब्ररी सुद्धा अतिशय सुसज्ज आहे जे समृद्ध दस्तऐवजीकरण संपादना साठी बहुमूल्य मदत करते.

प्रीमियम ओन्लीऑफिस वर्कस्पेस सूटची गोपनीयता, सुरक्षितता आणि बॅकअप लाभ हे तुमच्या वर्कफ्लोची कार्यक्षमता वाढविण्यासाठी भरपूर मदतीचे कार्य करते, छोटे बिजनेस, मोठे उद्योग, शैक्षणिक, गोपनीय सरकारी दस्तऐवजीकरण, ना-नफा, संशोधन आणि घरगुती वापरासाठी (विनामूल्य आवृत्ती) अतिशय योग्य पर्याय ठरतो.

६. फोटो एडिटर

तुम्हाला तुमच्या फोटोंचे कलाकृतींमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे का? डिजिटल इमेजरीच्या जगात हे परिवर्तन, योग्य इमेज एडिटिंग सॉफ्टवेअरने केले होते. जर तुम्ही लिनक्स वापरकर्ते असाल तर तुम्ही नशीबवान आहात. 

सहसा फोटोग्राफर विशेषत: त्यांच्या संपादन गरजांसाठी विंडोज किंवा मॅकOS कडे झुकतात. लिनक्स हे विंडोज किंवा मॅक OS सारखे लोकप्रिय नाही, त्यामुळे तुम्हाला Lightroom किंवा Photoshop सारखी मोठी नावे सापडणार नाहीत. कारण हे सॉफ्टवेअर आहेतच एवढे चांगले आणि त्यांनी ह्या इंडस्ट्री मध्ये आपले नाव त्यामुळेच बनवले आहे. मात्र प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर असल्या कारणाने आपल्याला पैसे सुद्धा तेव्हडेच मोजावे लागतात त्यासाठी. 

मात्र त्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला योग्य असे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर लिनक्स मध्ये सापडणार नाही. आपण या ट्रेंडला रोखू शकता आणि काही चांगल्या परिणामांसह लिनक्सकडे वळू शकता; तुम्हाला फक्त योग्य सॉफ्टवेअरने सुरुवात करावी लागेल. तुम्ही स्विच करण्यास तयार असाल, तर सर्वोत्तम लिनक्स फोटो एडिटरच्या आमच्या निवडी येथे देत आहेत.

गिम्प (GIMP)

जर तुम्ही कधी फोटो एडिटर संदर्भात वाचले अथवा सर्च केले असाल, तर तुम्ही गिम्प  (GNU इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम) बद्दल ऐकले असेलच. ह्याचे कारण हे केवळ लिनक्सवरच नाही तर विंडोज आणि मॅकOS सारख्या इतर ऑपरेटिंग सिस्टिमवरही उपलब्ध असलेले सर्वात व्यापक, विनामूल्य आणि मुक्त स्रोत फोटो एडिटर सॉफ्टवेअरपैकी एक मानले जाते.

काही वापरकर्ते फोटोशॉप सारख्या प्रोप्रायटरी टूल्सला प्राधान्य देऊ शकतात, परंतु GIMP स्वतःच अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे आणि फोटोशॉप एवढेच सक्षम असून, त्यासारखेच जवळपास सर्व काही करू शकते. GIMP प्लगइन्स वापरून, त्याची कार्यक्षमता अजून वाढवता येते, त्यापैकी काही गिम्पच्या अधिकृत इंस्टॉलेशनसह येतात तर काही तृतीय पक्षाच्या वेबसाइटवरून डाउनलोड केल्या जाऊ शकतात.

डार्कटेबल (DarkTable)

लिनक्स वापरकर्त्यांसाठी डार्कटेबल हा अजून एक पर्याय आहे कारण हे मूळ फोटोचा डेटा जतन करून आपल्याला विना-विध्वंसक संपादन  (Non Destructive Photo Editing) करू देते.

यात प्रगत रंग दुरुस्ती साधने, सर्वसमावेशक कॅमेरा सपोर्ट आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आहे जो नवशिक्या आणि तज्ञ दोघांनाही वापरता येईल. त्याची workflow व्यवस्थापन वैशिष्ट्ये कार्यक्षम फोटो एडिटिंग साठी आपल्या उत्तम साहाय्य करते.

डार्कटेबलच्या लक्षणीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लेन्स दुरुस्त करण्यासाठी त्याचा सपोर्ट. यामध्ये विविध कॅमेरा लेन्ससाठी प्रोफाइल समाविष्ट आहेत जे तुम्हाला आपोआप फोटो विकृती, रंग विकृती आणि विग्नेटिंग सुधारण्याची क्षमता देतात.

डार्कटेबलचा टिथरिंग सपोर्ट तुम्हाला कॅमेरा दुरून सुद्धा नियंत्रित करण्यास आणि थेट सॉफ्टवेअरमध्ये प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम करतो. यामध्ये एक्सपोजर ऍडजस्टमेंट, टोन मॅपिंग आणि शार्पनिंग सारख्या कामांसाठी अनेक मॉड्यूल्स देखील समाविष्ट आहेत.

७. विडिओ एडिटर

स्मार्टफोनच्या आगमनामुळे फोटो आणि विडिओ काढण्यची सोया आता आपल्या खिशात झाली आहे. काहींनी तर फक्त स्मार्टफोनच्या जोरावर आपला यूट्यूब चॅनेल सुद्धा हल्ली सुरु केला आहे. मात्र नुसता विडिओ काढणे आणि तो व्यावसायिक बनवणे ह्यात भरपूर फरक आहे. आणि त्यासाठी आपल्या एका चांगल्या विडिओ एडिटरची गरज पडते. 

व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर खरोखर महाग असू शकते, विशेषतः Adobe Premiere Pro सारखे अधिक प्रगत पर्याय. लिनक्स साठी काही उत्तम मोफत व्हिडिओ संपादन सॉफ्टवेअर प्रोग्राम आहेत जे Windows Movie Maker आणि iMovie पर्याय म्हणून काम करू शकतात. तथापि, चांगली बातमी अशी आहे की भरपूर विनामूल्य आणि मुक्त-स्रोत किंवा व्यावसायिक व्हिडिओ एडिटर उपलब्ध आहेत. हे पर्याय निव्वळ विनामूल्य नसून उत्कृष्ट कार्यक्षमता सुद्धा देतात.

केडेनलाइव्ह (Kdenlive)

केडेनलाइव्ह हा विडिओ एडिटिंग पर्याय फक्त लिनक्स साठी नाही तर विंडोज आणि मॅक OS  साठी सुद्धा आज एक उत्कृष्ट विनामूल्य आणि मुक्त स्रोत सॉफ्टवेअर म्हणून नावाजला जातो. व्हिडीओ संपादन क्षेत्रात उतरू पाहणाऱ्यांसाठी हा एक आदर्श पर्याय आहे. 

तुम्हाला तुमच्या व्हिडिओ प्रोजेक्ट्समध्ये वाढ करण्यासाठी भरपूर साधने सापडतील. भारावून न जाता तुम्ही अगदी लवकर शिकाल अशी ह्याची जडणघडण आहे. कटिंग, स्प्लिटिंग, ट्रान्झिशन, व्हिडिओ इफेक्ट्स, कॉपी-पेस्ट इ. सारखे उत्कृष्ट व्हिडिओ संपादन वैशिठ्ये ह्यात उपलब्ध आहेत. तसेच, हे विविध प्रकारच्या फाईल फॉरमॅट्स आणि कॅमकॉर्डर आणि कॅमेर्‍यांच्या विस्तृत हार्डवेअरना सपोर्ट करते.

शॉटकट (Shotcut)

लिनक्ससाठी शॉटकट हे आणखी एक व्हिडिओ संपादन सॉफ्टवेअर आहे आणि ते थोडे नाविन्यपूर्ण आहे कारण त्याचा UI, एडिटर पेक्षा मीडिया प्लेयरसारखा दिसतो. हे सॉफ्टवेअर अप्रतिम वैशिष्ट्यांसह व्हिडिओ संपादित करणे खूप सोपे करते. हे मूलभूत वापरांसाठी अगदी चांगले कार्य करेल, परंतु जर तुम्हाला अधिक शक्तिशाली पर्याय हवे असतील, विशेषत: प्रगत किंवा व्यावसायिक व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी, तर हा तेवढा चांगला पर्याय ठरत नाही. तथापि, त्यात असलेल्या वैशिष्ट्यांसह, ते लिनक्ससाठी एक उत्तम व्हिडिओ संपादक म्हणून पात्र आहे.

ओपेनशॉट  (Openshot)

ओपन शॉट हे पायथनमध्ये लिहिलेले लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमसाठी अनेकांपैकी एक व्हिडिओ एडिटर आहे. हे मुक्त-स्रोत व्हिडिओ संपादन सॉफ्टवेअर आहे आणि ते विनामूल्य उपलब्ध आहे. त्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अनेक ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो फॉरमॅटचा सपोर्ट. उत्तम ड्रॅग आणि ड्रॉप वैशिष्ट्य. ओपन शॉटमध्ये कटिंग, ट्रिमिंग, स्नॅपिंग आणि क्रॉपिंग करणे सोपे आहे. ओपन शॉट हे एक वापरकर्ता-अनुकूल सॉफ्टवेअर आहे जे कीफ्रेमचे ॲनिमेशन, व्हिडिओचे सोपे एन्कोडिंग, डिजिटल झूमिंग, एडिटिंग आणि ऑडिओ आणि डिजिटल व्हिडिओ इफेक्ट्सचे मिश्रण यासाठी देखील समर्थन देते. हे व्हिडिओ एडिटर सॉफ्टवेअर HDV आणि AVCHD सह हाय-डेफिनिशन व्हिडिओवर व्यावहारिक कार्य करण्यासाठी कंपोझिटिंग आणि मुख्यतः व्यापक संपादन साधन प्रदान करते.

ह्याव्यातिरिक्त तुम्ही ईतर सॉफ्टवेअर जसे कि DaVinci Resolve आणि Blender सुद्धा वापरू शकता मात्र त्यांना जास्त ताकदीचे हार्डवेअर लागते.

८. स्क्रीनशॉट सॉफ्टवेअर

स्क्रीनशॉट् सॉफ्टवेअर हे कोणतेही वर्कफ्लो, टूल्स किंवा कार्याबद्दल माहिती रेकॉर्ड करणे आणि शेअर करणे सोपे करते. एखादे कार्य पूर्ण करण्याच्या प्रत्येक पावलाबद्दल एखाद्याला फक्त सांगण्याऐवजी, स्क्रीनशॉट आपल्याला ते कार्य  कसे, काय, का आणि बरेच काही दर्शवू देतात.

परंतु लिनक्स वापरकर्त्यांसाठी स्क्रीनशॉट घेणे आणि त्यावर भाष्य करणे थोडे क्लिष्ट ठरू शकते. उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी आणि बाण, मजकूर आणि इतर भाष्यांसह हे स्क्रीन ग्रॅब संपादित करण्यासाठी तुम्हाला एक चांगले स्क्रीनशॉट साधन आवश्यक आहे. पण चांगली गोष्ट अशी कि लिनक्स मध्ये असे उच्च प्रतीचे स्क्रीनशॉट सॉफ्टवेअर बरेच आहेत.

फ्लेमशॉट (Flameshot)

फ्लेमशॉट हा स्क्रीनशॉट घेण्यासाठी विनामूल्य, मुक्त-स्रोत, साधा परंतु शक्तिशाली सॉफ्टवेअर आहे. ह्यात कीबोर्ड शॉर्टकटचे फिचर आहे आणि GUI किंवा कमांड लाइनद्वारे तुम्ही त्याला कॉन्फिगर करू शकता.

फ्लेमशॉट वैशिष्ट्ये:

  • हे वापरण्यास सोपे आहे आणि पूर्णपणे customise  करण्यायोग्य इंटरफेससह येते.
  • ॲप मध्येच तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येते.
  • तुम्हाला Imgur वर स्क्रीनशॉट अपलोड करण्याची सोया आहे.
  • सिस्टम ट्रे आणि बरेच काही सपोर्ट  करते.

स्पेक्टॅकल (Spectacle)

डेस्कटॉप स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्पेक्टॅकल हे आणखी एक वापरण्यास सोपे साधन आहे. संपूर्ण डेस्कटॉप, एक मॉनिटर, सक्रिय असलेला एकच  विंडो, किंवा स्क्रीनचा आयताकृती भाग कॅप्चर करण्यासाठी हा एक योग्य पर्याय ठरतो..

स्पेक्टॅकलची  वैशिष्ट्ये:

  • GUI मोडमध्ये लाँच करू शकता  (डीफॉल्ट)
  • स्क्रीनशॉट कॅप्चर करा आणि GUI न दाखवता बाहेर पडा
  • डायरेक्ट तुमचा स्क्रीनशॉट IMGUR किंवा फेसबुक वर अपलोड करता येतो. 
  • स्क्रीनशॉट घेण्यापूर्वी क्लिकची प्रतीक्षा करा

१०. फोटोग्राफी / फोटो मॅनेजमेंट 

सोशल मीडिया पोस्टपासून तुमच्या अलीकडील खरेदीच्या पावत्यांपर्यंत तुम्ही सर्वत्र फोटो वापरत असताना तुमचा डिजिटल फूटप्रिंट सतत विस्तारत असतो. आपण फक्त फाइल व्यवस्थापन ॲप्सवर अवलंबून राहिल्यास या सर्व फोटोंचा मागोवा ठेवणे कठीण होऊ शकते.

सुदैवाने, तुमचे फोटो अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी लिनक्स साठी बरेच शक्तिशाली फोटो व्यवस्थापन, आयोजक आणि गॅलरी ॲप्स उपलब्ध आहेत. हे ॲप्स तुमचा वेळ आणि मेहनत वाचवू शकतात, विशेषत: आपला फोटो संग्रह मोठा असेल तेंव्हा ह्याची गरज जास्त भासते.

डिजिकॅम (DigiKam)

डिजीकॅम हे फीचर-पॅक असलेले लिनक्स फोटो मॅनेजर आहे जे तुम्हाला तुमच्या प्रतिमा, कॅमेरा / विडिओ कॅम अश्या बाह्य स्रोतांसह अनेक स्त्रोतांमधून आयात करू देते. हे तुम्हाला तुमचे फोटो, अल्बममध्ये व्यवस्थापित  करण्यास  मदत करते आणि सोप्या शोधासाठी टॅग देखील जोडते. हे ॲप RAW सह सर्व प्रमुख फोटो फॉरमॅटना सपोर्ट करते. 

डिजिकॅम  तुम्हाला तुमचे अल्बम सहजपणे फिल्टर आणि सॉर्ट करण्यास मदत करते.  तुम्हाला मोठी फोटो लायब्ररी प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करते. याव्यतिरिक्त, ते फोटो संपादन एडिटिंग सुद्धा करू शकते जेणेकरून आपण आपल्या फोटोची गुणवत्ता बदलून अधिक चांगले करू शकतो. ह्याचबरोबर तुम्ही दोन फोटोंची शेजारी शेजारी तुलना देखील करू शकता.

हे जवळजवळ एक व्यावसायिक ॲप आहे, म्हणूनच ते लिनक्स साठी सर्वोत्तम फोटो व्यवस्थापन आणि गॅलरी ॲप्सपैकी एक आहे.

शॉटवेल (ShotWell)

बऱ्याच काळापासून, लिनक्स प्रणाली साठी शॉटवेल हे डीफॉल्ट फोटो आयोजक होते. हा फोटो आयोजक  प्रामुख्याने GNOME डेस्कटॉप वातावरणासाठी विकसित केला आहे. सोपे असूनही, ते आपल्या फोटोंचे  सर्व तपशील आपल्याला दाखवते आणि त्यांना कार्यक्षमतेने आयोजन करण्यासाठी सर्व आवश्यक टूल्स ऑफर करते.

तुम्ही तुमचे फोटो हे तारीख, वेळ आणि स्थानानुसार आयोजित करू शकता. याव्यतिरिक्त, ॲपमध्ये आपल्या फोटोंना रेट करण्यासाठी आणि त्या रेटिंगच्या आधारावर प्रतिमा शोधण्यासाठीचे वैशिष्ट्य उपलब्ध आहे.

शॉटवेल तुम्हाला इतर स्त्रोतांकडून फोटो  आयात करण्याची सुविधा देते आणि तुम्हाला काही मूलभूत फोटो एडिटिंग मध्ये मदत करते. हे तुम्हाला मूळ फोटोंचे संरक्षण करण्यासाठी मूळ फोटोऐवजी त्यांचा कॉपी वर एडिटिंग करण्याची सोय उपलब्ध करून देते.