मी जेंव्हा लिनक्स पहिल्या वेळेस वापरायचा प्रयत्न केला तेंव्हा ते बऱ्याच प्रमाणात वापरण्यास कठीण होते. तो काळ सण २००० च्या सुरुवातीचा होता. मी सुरुवात रेड हॅट पासून केली आणि “लिनक्स फॉर यु “ वगैरे मासिकांमधून तेंव्हा लिनक्स आणि त्याच्या सॉफ्टवेअर CD ; त्यामध्ये मिळत असत.
अर्थात तेंव्हा डायल-अप मॉडेमचा जमाना होता आणि आपल्याला आजच्या सारखी इंटरनेट वर पटकन माहिती मिळत नसे. त्यामुळे लिनक्स हे तेंव्हा फक्त कंप्युटर सायन्स चे विद्यार्थी , सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा हॅकर्स ह्यांच्या पुरते मर्यादित होते. कारण फक्त त्यांना जास्त ताकदीचे, फ्लेक्सिबल आणि अत्यंत सुरक्षित किंवा अत्यंत विश्वसनीय आणि मध्येच बंद न पडणारे ऑपरेटिंग सिस्टिम हवे होते. खास करून ते ज्यांना विंडोज ची मक्तेदारी झुगारून स्वतंत्र असे काही हवे होते.
आजचे लिनक्स हे बऱ्याच प्रमाणात सोपे झाले आहे. किंबहुना आज मला लिनक्स इन्स्टॉल करणे किंवा लिनक्स मध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, विंडोज पेक्षा सुद्धा सोपे वाटते. शिवाय मी लिनक्स कुठल्याहि जुन्या लॅपटॉप / संगणकावर इन्स्टॉल करू शकतो. शिवाय लिनक्स जरी संगणक प्रणाली मध्ये विंडोज किंवा ऍपल पेक्षा मागे असले तरी त्याचा वापर आज स्मार्टफोन, टीवी , दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ह्या मध्ये प्रामुख्याने वापरले जाते. त्याचे कारण लिनक्सला आपल्याला हवे तसे पैलू पाडले जाऊ शकतात, तेही कुठेही त्याचा सुरक्षिततेला धोका न पोहोचवता.
थोडक्यात लिनक्स नुसते जास्त खात्रीलायक, जास्त सुरक्षितच नाही तर त्याचा वापर हल्ली जास्त आनंद प्रदान करून देऊ शकते. कारण तुम्ही त्याला आपल्या दृष्टीने वापरू , customise करू शकता.
विचार करा तुमच्या मित्र / मैत्रिणींना दररोज तुमचा डेस्कटॉप वेगवेगळा दिसला तर… आणि फक्त वॉलपेपर बदलणे ह्याला मी वेगळे मनात नाही, ते सगळी OS करू शकतात.

पाहूया अश्याच काही गोष्टी ज्या तुम्हाला लिनक्स मध्ये सहज सध्या होतात, पण विंडोज किंवा मॅक OS मध्ये (सहजपणे) करता येत नाहीत.
निवड स्वातंत्र्य!
लिनक्स म्हणजे स्वातंत्र्य. एखाद्या कंपनीने अधोरेखित केलेल्या संकुचित कक्षेबाहेर जाऊन आपल्याला जसे हवे तसे कार्य निवडण्याचे स्वातंत्र्य. हे निवडीचे स्वातंत्र्य एवढे आहे कि माणूस चक्रावून जाईल इतके निवड स्वातंत्र्य.
आपल्याला हवे ते फाईल मॅनेजर पासून हवे ते कर्नेल , हवे ते शेल, हव्या त्या स्टार्टअप सर्विस पासून हवे ते सॉफ्टवेअर पॅकेज मॅनेजर निवडण्याचे स्वातंत्र्य. काही लिनक्स डिस्ट्रो मात्र, वापरकर्त्यांनी भांबावून जाऊ नये, म्हणून मर्यादा आणतात. पण तरी सुद्धा थोड्याशा अधिक माहितीने, प्रयत्नाने तुम्ही त्यात हवे ते बदल करू शकता.
उदाहरणार्थ तुम्ही जर एखादे डिस्ट्रो वापरात असाल जे गनोम (GNOME) डेस्कटॉप वापरते, आणि तुम्हाला ते भावत नसेल तर तुम्ही त्याच्या ऐवजी KDE, बजी (BUDGIE), XFCE, Pahtheon पैकी काहीही वापरू शकता. लिनक्सचे वैशिष्ट्यच आहे कि तुम्हाला काही आवडले नाही – बदलून टाका. ते सुद्धा विनामूल्य.

इतके कस्टमाईजेशन करू शकता कि तुम्ही काही मिनिटांमध्ये आपल्या संगणकाला विंडोज किंवा मॅकOS चे लूक देऊ शकता. तुम्हाला एकाच संगणकावर डेबियन आधारित कार्यप्रणाली बदलून रेड हॅट प्रेरित कार्यप्रणाली वापरू शकता. (प्रयत्न करून पहा विंडोज बदलून मॅकOS टाकण्याचा)
जुन्या संगणकांना पुनर्जीवन
ज्या संगणकावर हा लेख लिहिला गेला आहे तो २०१२ सालचा अँपल मॅकबुक प्रो आहे. आणि आज सुद्धा तो तेवढ्याच सफाईने चालतो कि मला त्याला बदलायची गरजच पडली नाही एवढ्या वर्षात.

माझा दुसरा संगणक हा 2011 सालचा विंडोज संगणक आहे ज्यावर सुद्धा मी लिनक्स वापरतो. हीच गत साधारण जगभरातील जवळपास बऱ्याच नवीन संगणकांची झाली, जेंव्हा विंडोज 11 साठी मायक्रोसॉफ्ट ने अतिशय कडक अश्या हार्डवेअर ची मागणी केली, ज्या मध्ये अशा बऱ्याच ३-४ वर्षांपूर्वीच्या आणि सध्य-स्थितीत देखील चालू शकणाऱ्या संगणकांचा समावेश केला गेला नाही.
होय! तुम्ही ते संगणक, जुन्या विंडोज प्रणाली (जसे विंडोज 8, 10) द्वारे वापरू शकता. पण जर त्याचे सेक्युरिटी अपडेट बंद झाल्यामुळे तुम्ही हॅकर्सच्या जाळयात सहज सापडू शकता. म्हणून आपले संगणक नेहमीच अपडेटेड असावे. लिनक्स मध्ये तुम्ही आपले संगणक वर्षानुवर्षे नव्याप्रमाणे ठेऊ शकता कारण ते दर सहा महिन्यांनी (सेक्युरिटी अपडेट मात्र नेहमीच येतात), दर दोन वर्षांनी नवीन व्हर्जन, किंवा काही काही आर्च सारखे तर दररोज सुद्धा अपडेट होतात.
माझा अजून एक संगणक तर 2007 सालचा आहे आणि तो आज सुद्धा वापरात आहे (एमएक्स-लिनक्स आहे त्यावर), ह्यावरून तुम्ही ठरवू शकता कि तुम्हाला लिनक्स आपल्या संगणकासाठी किती उपयुक्त आहे ते.
विश्वसनीयता आणि खात्री!
आज जगभरातील 90% इंटरनेट सर्वर हे लिनक्स वापरतात. त्यावरूनच त्यांची खात्रीलायकता दिसून येते. ह्या कार्यप्रणालीची सुरक्षितता आणि असंख्य वर्ष चालत राहण्याची क्षमता याला कारणीभूत आहे. आपल्या घरगुती संगणकामध्ये सुद्धा हीच विश्वसनीयता येते कारण मूलभूत कार्यप्रणाली तीच आहे. त्यामुळे तुम्हाला लिनक्स कधी फारसे क्रॅश होताना सापडत नाही.
(आठवते का ते विंडोज चे फेमस ब्लू स्क्रीन ऑफ डेथ! )

बरं , लिनक्स क्रॅश होतंच नाही असे नाही, पण ते फार क्वचित वेळा. आणि झाले तरी त्यात तसे लॉग फाईल तयार होतात कि जेणेकरून ते कशामुळे झाले आणि त्याचे निवारण कसे करता येईल ते समजणे सोपे असते. शिवाय बऱ्याच लिनक्स डिस्ट्रो मध्ये अपडेट करताना जर अडचण आली तर आपण अगदी सोप्या रीतीने जुन्या व्हर्जन वर परत जाऊ शकता.
थोडक्यात लिनक्स चालत राहते, चालत राहते, वर्षानुवर्षे चालतच राहते. आणि आपल्याला आपल्या संगणकाचा उपभोग कंटाळा येई पर्यंत घेता येतो आणि अगदीच आपली गरज (नवीन हार्डवेअर साठी) बदलली किंवा आपल्या संगणकामध्ये काही हार्डवेयर खराब झाले, तरच आपल्याला संगणक बदलावा लागतो.
विनामुल्य आणि मुक्त!
विंडोज किंवा मॅकOS जरी तुम्हाला हार्डवेअर सोबत फुकट मिळते असे वाटत असेल तरी ते तसे नसते. ह्या संगणक प्रणालीचा लायसन्स खर्च, हार्डवेअर मध्येच जोडला गेला असतो. शिवाय जर तुम्हाला विंडोज अपग्रेड करायचे असेल तर तुम्हाला ते विकत घ्यावे लागते. लिनक्स मध्ये तसे नाही. बहुतांश लिनक्स डिस्ट्रो हे प्रामुख्याने विनामूल्य असतात. काही झोरीन सारखे अपवाद सोडले तर! (त्यात सुद्धा तुम्हाला मोफत वाले व्हर्जन उपलब्ध असते ). कारण ते GPL (General Public License ) वापरतात ज्यांचे काही नियम आहेत आणि त्यात महत्वाचा मुद्धा हा विनामूल्य असण्याचा आहे.
नुसते हेच नाही तर लिनक्स मध्ये जागतिक दर्जाचे सॉफ्टवेअर सुद्धा उपलब्ध आहे, जे बऱ्याच तोलामोलाच्या विंडोज सॉफ्टवेअर बरोबर त्याच ताकदीने उभे राहू शकतात. शेकड्याने सॉफ्टवेअर लिनक्स मध्ये उपलब्ध आहेत जे तुमच्या दैनंदिन गरजाच नाही तर व्यावसायिक स्तरावर सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरू शकतात – आणि ते सुद्धा फुकट. असेच काही सॉफ्टवेअर आपण मागील भागात पहिले आहेत. (पहा)
हल्ली बरेचसे असे सॉफ्टवेअर, जे लिनक्स साठी निर्माण करण्यात आले होते, आता त्यांच्या उपयुक्तते मुळे, विंडोज आणि मॅकOS मध्ये सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. त्याची माहिती आपण पुन्हा कधी तरी घेऊ.
शिवाय लिनक्स मधील सॉफ्टवेअर स्टोर मुळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे हे अँड्रॉइड फोन मधील प्ले-स्टोर वापरण्या एवढे सोपे झाले आहे. ह्या शिवाय स्नॅप आणि फ्लॅटपॅक सारख्या पॅकेज मुळे झूम किंवा डिस्कॉर्ड किंवा अगदी मायक्रोसॉफ्टचे टीम सारखे असंख्य प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर सुद्धा लिनक्स वर उपलब्ध झाले आहेत.
विंडोज सॉफ्टवेअरचा वापर
ज्यांना अगदीच विंडोज मधील प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची गरज पडते, ते सुद्धा लिनक्स मध्ये WINE द्वारे त्याचा वापर करू शकता. अर्थात काही काही वेळा ते तेवढ्या सराईतपणे चालत नाही पण बऱ्याच अंशी तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकता. वाईन तुम्हाला बऱ्याच सॉफ्टवेअर स्टोर मध्ये मिळेल ज्यातून तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता.
ह्या शिवाय तुमचा संगणक जर पॉवरफुल असेल तर तुम्ही Virtual Manager वापरून किंवा नवीन Bottles नामक सॉफ्टवेअर वापरून सुद्धा लिनक्स मध्ये विंडोज सॉफ्टवेअर वापरू शकता.
रीबूट शिवाय अपग्रेड
तुम्ही काही महत्वाचे काम करत आहात. अचानक तुम्हाला एक अपडेट किंवा अपग्रेड चे नोटिफिकेशन येते. किंवा तुम्ही काही वेळे साठी आपल्या संगणकाच्या जवळ नाही आहात, आपले काम तुम्ही सेव्ह केले नाही आणि आल्यावर पाहता तर तुमचा संगणक अपग्रेड होतो आहे आणि तुमचे केलेले काम तर गेलेच आहे, शिवाय तुम्हाला जो पर्यंत सगळे अपग्रेड डाउनलोड होई पर्यंत वाट पाहावी लागते शिवाय तुमचा संगणक नंतर रिबूट सुद्धा होतो. हा अनुभव बऱ्याच वेळा तुम्हाला विंडोज वापरताना येत असेल.

बहुतेक वेळा (नेहमीच म्हटले तरी चालेल) मला लिनक्स अपडेट किंवा अपग्रेड करताना कधीच आपले काम थांबवावे लागत नाही. शिवाय मी अपडेट आपल्या सोयीप्रमाणे करता येते. शिवाय मी काम करत असताना सुद्धा बॅकग्राऊंड मध्ये मी अपडेट करू शकतो. माझ्या कामामध्ये कधीच त्याचा अडथळा आला नाही. शिवाय मला अपडेट करताना कधी रीबूट करायची गरज पडली नाही. तुम्हाला फक्त रीबूट तेंव्हा करावे लागते, जेंव्हा लिनक्स, नवीन कर्नेल अपडेट करते. त्यात सुद्धा तुम्ही काम करत असताना रिबूट करायची गरज नाही. आपले काम संपल्यावर तुम्ही आपल्या सोयीने ते करू शकता.
पहले इस्तमाल करो फिर विश्वास करो
लिनक्स मध्ये वर सांगितल्या प्रमाणे तुमच्या कडे निवडीचे इतके पर्याय आहेत कि तुम्हाला कुठले भावेल ह्याची कल्पना करणे अवघड होऊन जाते. अर्थात लिनक्स मध्ये त्याचा सुद्धा तोडगा करून ठेवला आहे. तुम्ही इन्स्टॉल करण्या आधी लिनक्सला एका थंब ड्राईव्ह महदये इन्स्टॉल करून वापरून पाहू शकता. आपल्या सध्याच्या संगणक प्रणाली ला हात सुद्धा न लावता. जे कुठले डिस्ट्रो तुमच्या पसंतीस उतरेल आणि आपल्या हार्डवेअर ला सपोर्ट करते ते तुम्ही नंतर इन्स्टॉल करू शकता.
अँटी वायरसची गरज (सहसा) नाही
लिनक्स मध्ये एका गोष्टीची कमतरता आहे – आणि ते म्हणजे अँटी वायरस. ह्याचे कारण कि ह्या कार्यप्रणालीची घडणच अशी आहे कि त्यात अँटी वायरसची गरज तेवढी भासत नाही.
अर्थात विंडोज एवढे लोकप्रिय असल्यामुळे ते अशा वायरस आणि मालवेअरच्या केंद्रस्थानी असते. परंतु लिनक्स मध्ये त्याच्या अत्यंत महत्वाच्या गाभार्याच्या वर एक सुरक्षित आवरण असते जे सुपर युजर शिवाय कोणालाच बदल घडवू देत नाही, त्यामुळे त्याला एक अत्यंत कार्यक्षम असे सुरक्षा कवच प्रदान केलेले असते जेणे करून वायरस किंवा मालवेअरचा शिरकाव किंवा त्याचा हल्ला अत्यंत कठीण होऊन जाते.
थोडक्यात लिनक्स ही एक अशी नाविन्यपूर्ण संगणक प्रणाली आहे, जी तुम्हाला भरपूर सुरक्षितता, कार्यक्षमता, वर्षानुवर्षे वापरण्याची सुविधा आणि एक वैयक्तिक प्रणालीची अनुभूती देते.
