• June 29, 2026

NPL-Tech

Noob Plays and Learns Technology

लिनक्स प्रवास प्रारंभ करण्याआधी!

तर तुमची जिज्ञासा तुम्हाला एका सुरक्षित, गतिमान आणि विविधतेने नटलेल्या संगणक प्रणाली कडे घेऊन आली आहे तर – होय आम्ही लिनक्स बद्दलच बोलतो आहोत. तुमची हि जिज्ञासा जपण्यासाठी आणि ह्यात यशस्वी होण्यासाठी काही मूलमंत्र.

1. घाबरून अथवा भारावून जाऊ नका.

लिनक्स जरी तुमच्या साठी नवीन असले तरी हे लक्षात घ्या कि जगातील लाखो संगणक जाणकार (आणि असंख्य संगणक न जाणणारे) सुद्धा ते वापरात आहेत. हि प्रणाली ३० वर्षांपासून कार्यरत आहे आणि दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. असंख्य संगणक प्रणाली आले आणि गेले; पण लिनक्स अजून आपल्या जागी निश्चल आहे. 

एक काळ असा होता (नव्वदीचे दशक) जेंव्हा लिनक्स वापरण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घेण्याची आवश्यकता होती. पण आता हे विंडोज एवढेच नाही तर काही बाबतील तर विंडोज पेक्षाही सोपे झाले आहे. अर्थात कुठलीही नवीन गोष्ट वापरताना आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे कि काही गोष्टी ह्या थोड्याफार फरकाने वेगळ्या असणारच आहेत. अहो ! आजसुद्धा सॅमसंगचा फोन वरून इतर कुठलाही दुसरा अँड्रॉइड फोन वापरायचा असेल तरी सुरुवातीला आपल्याला त्यातील काही गोष्टी वापरण्यात अडचण येतेच. एकच मोबाईल प्रणाली असून सुद्धा (अँड्रॉइड) ; आणि इथे तर अखंड नवीन संगणक प्रणाली आहे. 

2. इंटरनेट आपला मित्र.

आजच्या इंटरनेटच्या महाजालात; त्याच्या सारखा आपला मित्र नाही. इंटरनेट वर आपल्याला लिनक्स संदर्भात असंख्य माहिती मिळेल. कुठेही अडले तरी एक गूगल सर्च आपल्याला शेकडो पाने माहिती पुरवेल. त्यामुळे आपल्याला कुठल्याही अडचणींवर समाधानकारक उत्तरे हमखास मिळून जातील. फक्त एकाच माहितीवर अवलंबुन राहू नका – कारण ह्यात काही चुकीचे कमांड जर असेल तर त्यातून जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. 

यूट्यूब वर आणि इतर ठिकाणी बरेचशे ऑनलाईन कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने आणि क्रमाक्रमाने आपल्याला लिनक्स इन्स्टॉल करण्यापासून ते ट्रबल शुट करण्यापर्यंत आपल्याला मदत करतात.

3. मदत मागण्यात कचरू नका.

इंटरनेट वर एक मोठा समाज / समुदाय आहे जो तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतो. मात्र काही वापरकर्ते असे सुद्धा आढळतील जे तुम्हाला थोडे आगाऊ / सडेतोड आढळतील आणि तुमची खिल्ली उडवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम. अर्थात अशी संख्या कमी असते पण प्रत्येक समाजामध्ये जसे हे आढळतात तसेच लिनक्स वर सुद्धा आढळतात. 

अर्थात एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे कि लिनक्स वापरकर्ते किंवा डेव्हलपर सुद्धा हे कुठल्याही कंपनेचे पगारी नसतात. अर्थात ते आपले व्यावसायिक काम सांभाळून लिनिक्सला अजून चांगले बनविण्यास फावल्या वेळात मदत करत असतात. त्यामुळे काही मदत मागायच्या अगोदर थोडे इंटरनेट वर संशोधन करणे चांगले. शिवाय मदत मागताना आपण काय काय वाचले किंवा त्यात काय अडचण आली हे सांगितले तर आपल्या बद्दलचा आदर वाढण्यात मदत होते. ह्याशिवाय आपण कुठले हार्डवेअर / लॅपटॉप / संगणक वापरतो त्याची माहिती देणे उचित ठरते; कारण बऱ्याच वेळा काही अडचणी फक्त ठराविक अशा हार्डवेअर मध्येच येतात. 

आपण जे निवडलेले डिस्ट्रो असेल त्यांचे शक्यतो शेकडो फोरम तुम्हाला सापडतील. ह्या शिवाय ज्यावर आपले डिस्ट्रो आधारित आहे (उदा. डेबियन, उबंटू, फेडोरा, आर्च इत्यादी) त्यावर तर जास्तच फोरम आढळतील. आपल्याला जे फोरम भावेल त्याला सबस्क्राईब करा. आणि त्यावर इतर वापरकर्त्यांना काय अडचणी आल्या ते वाचा म्हणजे पुढेमागे आपल्याला तसेच काही आढळून आले तर आपल्याला त्याचा उपयोग होईल.

4. कमांड लाईनचा उपयोग वेळोवेळी करावा लागेल

Photo Courtesy : Tecmint

नव्वदीच्या दशकाच्या मानाने लिनक्स सध्या फारच विकसित झाले आहे. त्यामुळे त्यात बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला GUI द्वारे ऍडजस्ट करता येतात. बरेच डिस्ट्रो आपल्याला ड्राईव्हर मॅनेजमेंट , उपडेट, सेटिंग मॅनेजर वगैरे साठी GUI दिलेले असतात. आणि आपल्याला कमांड लाईनची फारशी गरज पडणार नाही. 

तरी सुद्धा कमांड लाईन कडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा त्याने बावरून सुद्धा जाण्याची गरज नाही. कारण कुठलीही मदत आपल्याला लागली तर मदत करणारा आपल्याला नक्कीच आपल्याला एखादी कमांड वापरायला सांगेल. शिवाय एकदा जर तुम्ही उपडेट कमांड वापरले तर त्याचा वेग पाहून तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस GUI ऐवजी कमांड लाईन वापराल.

5. बॅकअप , बॅकअप आणि बॅकअप

आपण लिनक्स (किंवा कुठलिही संगणक प्रणाली) हे नव्याने वापरात असाल किंवा बऱ्याच वर्षांपासून वापरात असाल; बॅकअप हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक असे साधन आहे. कारण कुठल्याही संगणक प्रणाली मध्ये आपल्याला कधी तरी काही तरी अडचण येणारच. खास करून जेंव्हा आपण ते उपडेट करत असू तेंव्हा. त्यामुळे लिनक्स मध्ये सुद्धा बॅकअप घेण्याची सवय अंगवळणी पडून घ्या. 

अर्थात लिनक्स मध्ये बरेचसे चांगले बॅकअप सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत (उदा. टाईमशीफ्ट, बाकूला,  डेजा डूप वगैरे ). आम्ही ह्यातील टाईमशीफ्ट तुम्हाला शिफारस करतो. हे निव्वळ बॅकअप नाही तर त्यातील स्नॅपशॉट साधन हे अत्यंत मूल्यवान आहे. म्हणजे समजा तुम्ही आपले लिनक्स व्हर्जन अपडेट केलेत आणि त्यात तुम्हाला काही अडचण आली किंवा काही गोष्टी नीट चालत नाहीत असे आढळून आले, तर तुम्ही आदल्या किंवा ह्या अगोदर जे व्हर्जन वापरात होतात तिथे रोलबॅक करू शकता आणि आपले संगणक पुन्हा पुर्वव्रत सुरु होईल.

6. आपल्या सध्याच्या प्रणाली बरोबर ड्युअल बूट करा लिनक्स

आपण जरी कितीही लिनक्स आत्मसात करू म्हटले तरी सुरुवातीच्या काळात आपल्याला काही ठिकाणी विंडोजची गरज भासणार आहे. त्यामुळे विंडोजला एक्दम हद्दपार करू नका. खास करून जो पर्यंत तुम्हाला आपले सगळे काम, आपापले सगळे सॉफ्टवेअर लिनक्स मध्ये आपण वापरू शकतो असा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत.

अर्थात जर तुम्ही नेहमीच विंडोजच्या वाट्याला जाल तर हे कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे आमचा सल्ला असा राहील कि आपले बूट ऑर्डर (हो लिनक्स ड्युअल बूट मध्ये इन्स्टॉल करताना आपल्याला हे करता येते) ह्यात सर्वप्रथम लिनिक्सला प्राधान्य द्या, जेणेकरून आपण आपसूकच संगणक सुरु केल्याकेल्या लिनक्स मध्ये प्रवेश करू. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये काही गरज पडली तर ते कसे लिनक्स मध्ये कसे करायचे ह्याची माहिती इंटरनेट वर जाणून घ्यायचा प्रथम प्रयत्न करा.

सर्व विंडोज सॉफ्टवेअर तुम्हाला लिनक्स वर मिळणार नाहीत त्यामुळे त्यांच्या ऐवजी कुठले लिनक्स सॉफ्टवेअर वापरता येईल ह्याची माहिती घ्या आणि ते वापरा. आम्ही मागे लिनक्स साठी उपयुक्त असे काही दैनंदिन सॉफ्टवेअर आपल्याला दिलेले आहेत.

हे वाचा : लिनक्स – काही आवश्यक ॲप्लिकेशन्स  

काही दिवसांनी आपल्याला आढळेल कि आपल्याला विंडोज मध्ये जाण्याची गरजच पडत नाही आणि त्या दिवशी तुम्ही विंडोज हद्दपार करू शकता.

7. लिनक्स शिकणे आणि वाचणे सोडू नका.

लिनक्स आपण आत्मसात केलेले आहे आणि आता आपल्याला ते पूर्णपणे अवगत आहे, अशा भ्रमात राहू नका. कारण जसे जसे आपण वापराल आणि त्याबद्दल वाचाल तेंव्हा तेंव्हा आपल्याला त्यात काही तरी नवीन सापडेल. एखादे नवीन सॉफ्टवेअर. आपण करत असलेली एखादी गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने किंवा अजून कार्यक्षम रित्या करण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. जेवढे वापराल तेवढे त्याच्या प्रेमात पडाल. आज उबंटू किंवा लिनक्स मिंट वापरत आहेत. कदाचित उद्या गरुड लिनक्स किंवा फेडोरा तुम्हाला भावेल. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिका आणि आपल्या संगणक प्रणालीचे ज्ञान चार लोकात पसरवा.

एक गोष्ट नक्की कि लिनक्स मध्ये विविधता एवढी आहे आणि कस्टमाइझेशन करण्याची एवढी सोय आहे कि आपण तीच प्रणाली वर्षानुवर्षे वापरत आहोत आणि त्याचा कंटाळा आला आहे, हे लिनक्स मध्ये तरी होणार नाही.

8. जे कराल त्याचा आनंद घ्या.

लिनक्स आपल्यासाठी नवीन आहे. त्यामुळे चिकाटी सोडू नका. काहीतरी नवीन आणि इतरांपासून वेगळे करतो आहोत त्याचा आनंद काही औरच असतो, तो आनंद लुटण्यास विसरू नका. नुसता आपल्या वेगळ्या दिसणाऱ्या डेस्कटॉपचा स्क्रीनशॉट इतरांबरोबर शेअर करा आणि पहा सगळे तुम्हाला कसे विचारतील कि काय वापरत आहेत म्हणून.

Picture Courtesy : Deepu.tech