आपला जुना संगणक आता पूर्वी सारखा सफाईदारपणे काम नाही करत. मागील लेखात सांगितलेली सर्व काळजी घेऊन सुद्धा आपण खुश नाही आहात (का ते आपण वाचले आहे), किंवा एक नवीन तंत्रप्रणाली आपापल्या जाणून घ्यायची आहे. अभिनंदन – आपण एकटे नाही. लिनक्स सध्या जवळपास 80% पेक्षा अधिक सर्वर आणि स्मार्टफोन मध्ये अगोदरच वापरले जात आहे. मात्र डेस्कटॉप / लॅपटॉप संगणका मध्ये त्याचे प्रमाण फक्त 3% च्या जवळपास आहे, आणि ते झपाट्याने वाढत आहे. विंडोज आता बऱ्यापैकी विकसित झाले आहे आणि सध्या ते पूर्वी पेक्षा सुद्धा अधिक स्थिर झाले आहे. मात्र तरी सुद्धा लिनक्स एवढी स्थिरता आणि सेक्युरिटी त्यात आढळून येत नाही.
लिनक्स आणि विंडोज मधले फरक आपण मागे जाणून घेतले आहे. (लिनक्स आणि विंडोज मध्ये काय फरक आहे? ). मात्र पूर्वीच्या मानाने आता लिनक्स फारच युजर फ्रेंडली झाले आहे. त्यामुळे तुम्हाला आपण काही फार वेगळे तंत्रज्ञान वापरत आहोत ह्याची जाणीव सुद्धा होऊ न देणारे लिनक्स डिस्ट्रो आता उपलब्ध आहेत, ज्याबद्दल आपण इथे वाचू शकतो (लिनक्स – नवीन यूजर साठी काही सोपे डिस्ट्रो)

तरी सुद्धा लिनक्स वापरण्यापूर्वी ह्या काही गोष्टी जाणून घेणे फायदेशीर राहील, जेणेकरून आपला हा लिनक्स प्रवास अधिक सुरळीत होऊ शकतो. मी जेव्हा लिनक्स वापरायला सुरुवात केली तेंव्हा त्याला इन्स्टॉल करणे हे सुद्धा एक कठीण काम होते, मात्र आज ते काही अंशी विंडोज पेक्षा सुरळीत इन्स्टॉल करता येते आणि एखादा नवशिखा सुद्धा त्याला व्यवस्थित इन्स्टॉल करू शकतो.
१. लिनक्स हे विंडोज नाही

लिनक्स असो अथवा विंडोज अथवा मॅक OS (ॲपल कार्यप्रणाली) – प्रत्येकाची विचारसरणी आणि तंत्रज्ञान हे वेगळे आहे. त्यात बरीचशी समानता सुद्धा आहे. जसे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI ), आयकॉन (चिन्ह) चा वापर, वेगवेगळे थिम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या सॉफ्टवेअर ची उपलब्धता. विंडोज ह्या बाबतीत मात्र फार पुढे आहे, कारण आपल्याला हवे असणारे आणि विंडोज वर चालणारे सॉफ्टवेअर प्रचंड प्रमाणात इंटरनेट वर उपलब्ध असते. मात्र बरेचशे सॉफ्टवेअर हल्ली लिनक्स मध्ये सुद्धा उपलब्ध झाले आहेत ज्यांची संख्या आज हजारो वर आहे.
अर्थात तरी सुद्धा जर तुम्ही बरीच वर्ष विंडोज वापरात असाल तर लिनक्स मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या जाणवतील
- विंडोज मध्ये जसे C , D असे ड्राईव्ह दिसतात तसे ते तुम्हाला इथे दिसणार नाहीत. कारण लिनक्स हा हार्डवेअर, फाईल आणि फोल्डर सगळ्यांना फ़ाईल समजतो. मात्र आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही , मात्र एवढे जाणून घेऊया कि तुम्हाला तिथे C , D असे ड्राईव्ह दिसणार नाहीत. तिथे तुम्हाला डिव्हासेस दिसतील आणि त्यांची नावे वेगळी दिसतील. मात्र हल्ली आपल्याला नेहमीच्या वापराचे जसे होम , डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, म्युसिक वगैरे फोल्डर विंडोज मध्ये दिसतात, ते सर्व लिनक्स मध्ये सुद्धा दिसतात. जेणेकरून वापरताना आपल्याला अगदी विंडोजचा भास होईल.
- विंडोज मध्ये आपल्याला कमांड लाईन चा उपयोग करायची सहसा गरज भासत नाही. लिनक्स सुद्धा बऱ्याच प्रमाणात GUI चा वापर करून आपल्याला हवे असलेले सर्व कार्य करण्यास मदत करते. मात्र आपल्याला जेव्हा एखाद्या वेळेस मदतीची गरज भासते, तेव्हा बरेचसे फोरम आपल्याला त्याचे उपाय हे कमांड लाईन मध्ये देतील, तेंव्हा घाबरून जायची गरज नाही. कमांड लाईन ला आपले मित्र माना.
२. सर्व प्रथम आपल्या कुठले सॉफ्टवेअर दैनंदिन कामासाठी हवे ते जाणून घ्या
आपल्या जुन्या संगणकाचा वापर आपण काही कामासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी सुद्धा वापरात असू. असे कोणते सॉफ्टवेअर आपण वापरता त्याची सर्व प्रथम लिस्ट करा. बरेचसे सॉफ्टवेअर जसेच्या तसे आपल्याला मिळणार नाही. पण त्याचा सारखेच दुसरे सॉफ्टवेअर आपल्याला हमखास उपलब्ध होईल. मात्र ते हाताळायला थोडे वेगळे असणारच, त्यामुळे सर्व प्रथम आपल्या वापरणाच्या सॉफ्टवेअर ची लिस्ट करा आणि त्याच्या बदली कुठले सॉफ्टवेअर वापरता येईल ते पहा. बरेचसे सॉफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऐवजी लिबरे ऑफिस [LibreOffice अथवा Only Office ], किंवा अडोबी फोटोशॉप ऐवजी गिम्प [GIMP] हे आपण विंडोज वर सुद्धा वापरून प्रथम पाहू शकता.

अर्थात जर आपले 80% काम हे काही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर मध्ये चालत असेल तर लिनक्स च्या वाट्याला सुद्धा जाऊ नका. मात्र हे जाणून घ्या कि लिनक्स मध्ये आपल्याला बरेचशे सॉफ्टवेअर हे फुकट भेटते आणि हजारो रुपये आपले वाचू शकतात. हो थोडे फरक आहेत ह्या सॉफ्टवेअर मध्ये पण ते शिकणे काही जास्त वेळ घेत नाहीत कारण विंडोज बघूनच हे बरेचशे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहेत जेणेकरून आपल्या फार काही वेगळे वाटू नये.
३. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची पद्धत
विंडोज मध्ये सहसा आपण एखादे सॉफ्टवेअर पाहिजे असल्यास आपण ते इंटरनेट वर सर्च करतो आणि सहसा त्या वेबसाईट वरून एक .exe फाईल डाउनलोड करतो. विंडोज मध्ये सुद्धा आता मायक्रोसॉफ्ट स्टोर आले आहे, मात्र लिनक्स मध्ये बहुतांशी सर्व डिस्ट्रो मध्ये असे ऍप स्टोर फार पूर्वीपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व दैनंदिन वापराचे सॉफ्टवेअर आपल्याला फक्त तिथे सर्च करून एका क्लिक मध्ये इन्स्टॉल करता येते. स्मार्ट फोन मुळे बहुतेकांना हि पद्धत आता परिचयाची झाली आहे.

ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादे सॉफ्टवेअर तिथे (ऍप स्टोअर मध्ये) सापडले नाही, तर त्याबद्दल सर्च केल्यावर तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे कमांड लाईन सापडेल जे अजून सोपे आहे. त्यामुळे कमांड लाईन जरी आपल्याला जास्त वापरावे लागले नाही तरी कधी कधी ते फार उपयोगी पडू शकते. म्हणून त्याला आपला मित्र समजा.
४. इन्स्टॉल करण्याआधी
अभिनंदन! आपण लाखो लोकांप्रमाणे लिनक्स इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहेत.
पण इन्स्टॉल करण्या आधी काही गोष्टी करणे आवश्यक आहे ते करूया. सर्वप्रथम आपले डॉक्युमेंट्स आणि इतर महत्वाचे जे काही असेल त्याचे बॅकअप घ्या. पूर्ण सिस्टिम बॅकअप घेतले तर आता उत्तम. कारण जर तुम्हाला पुन्हा नव्याने विंडोज इन्स्टॉल करावेसे वाटले तर हे उपयोगी पडेल.

वर सांगितल्या प्रमाणे विंडोज किंवा मॅक OS सारखे, लिनक्स हे एकाच पद्धतीचे नसते तर त्याचे अनेक डिस्ट्रो असतात. प्रत्येक डिस्ट्रो हा दिसायला वेगळा आणि त्यात असलेले (प्रीलोडेड सॉफ्टवेअर) हे वेगळे असतात. मात्र कुठला हि डिस्ट्रो इन्स्टॉल करण्यापूर्वी तुम्ही त्याला USB ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल करून पाहू शकता. त्याने तुम्हाला अंदाज येईल कि कुठला डिस्ट्रो आपल्यासाठी योग्य ठरू शकतो. लिनक्सची हि एक अत्यंत सुंदर खुबी आहे आणि ती त्याची पॉवर दाखवते.
हि विविधता जशी आपल्याला पसंती करण्यासाठी उपयोगी आहे तशीच ती गोंधळात देखील टाकते. कारण काही वेळेस आपल्याला सगळेच डिस्ट्रो आपल्या पसंतीत उतरू शकतात आणि काय घेऊ काय नको अशी परिस्थिती ओढावते. मात्र काळजी करू नका, प्रत्येक डिस्ट्रो तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रो सारखे बनवू शकता, अर्थात थोडी मेहनत, थोडा अभ्यास करायची गरज पडेल त्यासाठी.
हा लेख माझ्या सारख्या नवशिख्या (सध्याच्या भाषेत NOOB) साठी असल्यामुळे आपण येणाऱ्या सदरात काही असे नवीन वापरकर्त्यांना सोपे असे डिस्ट्रो पाहणारच आहोत.
५. सर्व हार्डवेअर चालेलच ह्याची शाश्वती नाही
लिनक्स सर्वप्रथम बाजारात अगदीच नवीन आलेल्या संगणकावर इन्स्टॉल करू नका. चालणार नाहीच असे काही नाही पण बऱ्याच वेळा त्या त्या हार्डवेअर चे सपोर्ट आलेले नसेल. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. लिनक्स जसे सांगितले तसे कोणा एकाच्या मालकीचे नाही पण सहकारी तत्वावर बनवले आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या सारखे लोकं, हे हार्डवेअर साठी लागणारे ड्राइवर बनावट असतात. विंडोजचे मार्केटशेअर 80% पेक्षा जास्त असल्यामुळे साहजिकच सगळे निर्माते प्रथम त्यासाठी ड्राइवर बनवतात. मात्र असेही नाही कि लिनक्स नवीन हार्डवेअर सपोर्ट करणारच नाही, पण हि शक्यता तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. हार्डवेअर म्हणजे वायफाय कार्ड, प्रिंटर, OLED स्क्रीन, काही एक्सटर्नल माऊस फंक्शन, RGB कीबोर्ड वगैरे. (हे विंडोज मध्ये सुद्धा होते पण सहसा हार्डवेअर विक्रेता तुम्हाला त्याच्या हार्डवेअरचे ड्राइवर वेगळे उपलब्ध करून देतो, विंडोज साठी)

सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही डिस्ट्रो तुम्ही इन्स्टॉल करण्यापूर्वी USB वर तपासून पाहू शकत असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्वरित अंदाज येऊ शकतो. एखादे डिस्ट्रो जर ते हार्डवेअर सपोर्ट करत नसेल तर तुम्ही दुसरे वापरून पाहू शकता. वर सांगितल्या प्रमाणे हि समस्या विंडोज मध्ये सुद्धा येऊ शकते आणि विंडोज प्रमाणे तुम्ही त्याचे ड्राइवर इन्स्टॉल करू शकता पण ते थोडे शोधावे लागते. ह्यात लिनक्सची चुकी नाही पण निर्माते सहसा स्वतः ते डेव्हलप करत नाहीत म्हणून कोणा तरी दुसऱ्याला ते करावे लागते आणि त्याला वेळ जातो. मात्र सर्व मोठ्या हार्डवेअर निर्मात्यांचे नवीन हार्डवेअर बऱ्याच प्रमाणात लिनक्स वर उपलब्ध होते, कालांतराने.
लिनक्स इन्स्टॉल करताना जर तुम्ही Wired Ethernet वापरले तर सर्वात उत्तम कारण अशा वेळेस बरेचशे हार्डवेअर ड्राइवर लिनक्स स्वतःच इन्स्टॉल करून आपला त्रास वाचेल आणि लिनक्स सुरळीतपणे काम करेल.
टीप : जर आपण कमांड लाईन वापरून lspci हा कमांड वापरलात तर आपले सगळे हार्डवेअर चे मॉडेल नंबर आपण पाहू शकता आणि ते लिनक्सवर सपोर्टेड आहे कि नाही ते इंटरनेट वर तपासून पाहू शकता.
६. सपोर्ट मिळणे सोपे नाही

लिनक्स हे सहकार तत्वावर निर्माण झाले आहे. त्यामुळे इथे सगळेच डेव्हलपर पगारावर काम करत नाहीत. हे सगळे आपली नोकरी, कामधंदा सांभाळून लिनक्स साठी निर्मात्याचे काम करत असतात. लिनक्स ह्या संगणक प्रणालीची सुरुवात हि टेकनिकल डेव्हलपर साठी झाली होती आणि त्यांनीच तिला मोठे केले आहे. त्यामुळे त्यातले काही तुम्हाला थोडेसे अहंकारी वाटू शकतात (आणि काही असतात सुद्धा) कारण त्यांची अपेक्षा असते कि तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी काही संशोधन इंटरनेट वर केले असेल. आपण केलेल्या गोष्टी सांगून जर तुम्ही प्रश्न विचारलात तर तुम्हाला योग्य उत्तर लवकर मिळून तुमच्या बद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल.
मात्र लक्षात ठेवा अशी लोकं आहेत पण कमी आहेत जे तुम्हाला सोपे प्रश्न विचारल्या बद्दल हिणवतील सुद्धा, मात्र बरीचशी अशी मंडळी आहेत जी आपल्याला मदत करण्यास आतुर असतात.
७. पासवर्ड जास्त वापरण्यास तयार रहा
लिनक्स हे आपल्या सेक्युरिटी साठी जाणले जाते आणि त्याच्या सुरक्षिततेचे एक मोठे कारण कि त्यात कुठलेही नवीन इंस्टॉलेशन करताना किंवा ज्याने त्याचा सुरक्षेसाठी अडथळा निर्माण होत असेल अशा सगळ्या गोष्टींसाठी ते ठिकठिकाणी तुम्हाला पासवर्ड विचारेल.

हेच कारण आहे कि लिनक्स हे विंडोज पेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. ह्याचा अर्थ लिनक्स 100% सुरक्षित आहे? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. पण ते नक्कीच विंडोज पेक्षा जास्त सुरक्षित आहे.
लिनक्स वापरणे अवघड नाही. आणि जुन्या संगणकांना पुनर्जीवित करणारी संजीवनी नक्कीच आहे. वस्तुस्थिती अशी आहे कि कदाचित वापरायला सुरुवात केल्यावर मिळत असलेल्या प्रचंड निवडीच्या स्वातंत्र्याने तुम्ही लाडावून जाल. एखादे सॉफ्टवेअर आवडले नाही, दुसरे वापरू. एखादे डिस्ट्रो जमले नाही, हरकत नाही, दुसरे निवडू.
त्यामुळे जर आपण विंडोज किंवा मॅक OS वापरात असाल तर आपण आपले डिस्ट्रो दिसायला तसेच बनवू शकता. लिनक्स थोडे जास्त टेक्निकल असेल पण सोपे आहे. तुम्ही जर त्याला एखाद्या नवीन गोष्ट शिकत असल्या प्रमाणे पहिले, तर ते अत्यंत थोड्या वेळात आत्मसात करू शकता, मात्र त्या साठी आपण खुल्या मनाने विचार करणे आवश्यक आहे. कुठलीही नवीन गोष्ट करताना थोडे शिकणे आवश्यक असते किंवा मदत घेणे जरुरीचे असते, तसेच लिनक्स साठी सुद्धा ते गरजेचे असते.
आणि हो! हे सगळे बहुतांशी आपल्याला फुकट मिळते आणि त्यात बराचसा चॉईस सुद्धा मिळतो; जेणेकरून आपण आपले काम नुसते झपाट्याने नाही तर विनामूल्य करून आपले हजारो रुपये वाचवू शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आपली ओळख / आयडेंटिटी ज्याला डिजिटल फूटप्रिंट म्हटले जाते ते ह्या व्यावसायिक कंपन्यांपासून गुप्त राखू शकता.
